CM देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचे पत्र, कोणता निर्णय घेण्याची केली विनंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:03 IST2024-12-24T20:00:59+5:302024-12-24T20:03:36+5:30

आमदार आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. निर्णय घेतल्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेन, असेही ठाकरेंनी म्हटले आहे. 

Aditya Thackeray's letter to CM Devendra Fadnavis, what decision was requested? | CM देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचे पत्र, कोणता निर्णय घेण्याची केली विनंती?

CM देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचे पत्र, कोणता निर्णय घेण्याची केली विनंती?

Aaditya Thackeray Devendra fadnavis: "आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून असलो तरी या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण याविषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील", असे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नव्या वर्षानिमित्त एक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. 

आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राजकीय होर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

आदित्य ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय? 

आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की, "२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता."

"खेद वाटतो आणि त्रास होतो"

"गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत, एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो", असे आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे. 

"गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत. आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो", असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी पत्रात मांडला आहे. 

खांद्याला खांदा लावून उभा राहील -आदित्य ठाकरे

"यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. महोदय, मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यादिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील", अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली आहे. 

Web Title: Aditya Thackeray's letter to CM Devendra Fadnavis, what decision was requested?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.