घोडबंदरच्या आदिवासीपाड्यांत दूषित पाणी
By Admin | Published: April 4, 2017 04:18 AM2017-04-04T04:18:08+5:302017-04-04T04:18:08+5:30
आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे
नामदेव पाषाणकर,
घोडबंदर- ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना घोडबंदर परिसरातील देवीचापाडा, पानखंडा, पाचवड, नागलाबंदर, टकारडा या आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळेवर टँकर मिळत नसल्याने बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.
आदिवासीपाडे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किमी अंतरावर आहेत. पाड्यांच्या काही फुटांच्या अंतरावर मोठी गृहसंकुले आणि बंगले आहेत. त्यांना पाणी मिळते, तर काही जागी टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्वी या पाड्यांच्या शेजारून वाहणाऱ्या जिवंत झऱ्यांना पाणी यायचे. तेच पाणी पिऊन आदिवासी जीवन जगत होते. मात्र, काही वर्षांत जवळच उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांत खोदलेल्या बोअरवेलमुळे या झऱ्यांचे जलस्रोत बंद झाले. वनजमिनीचे कारण सांगून आदिवासीपाड्यांना वीज, पाणी, पायवाटा नाकारण्यात येतात. टकारडा येथे दूरवर पाणी देण्यात आले,मात्रबाकीच्या पाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे.हे टँकर अनेकदा वेळेवर येत नसल्याने हातपंपाचे पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. पानखंडा येथील शाळेतील मुलांनादेखील हातपंपाचेच पाणी प्यावे लागत आहे.याबाबत, तेथील शिक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या शाळेची बोअरवेल अडीचशे फूट खोल आहे आणि आरोग्य विभागाने पाणीतपासणी केली असून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. दुसरीकडे पाड्यात असलेल्या अन्य तीन बोअरवेलची स्थिती नेमकी उलटी आहे. त्यापैकी एक बंद आहे, तर अन्य दोन बोअरवेलचे पाणी कपडे, धुणीभांडी आणि पिण्यासाठी वापरले जाते. १० ते १५दिवसांतून टँकर येत असल्याने बोअरवेलचे पाणी पिण्याशिवाय येथील रहिवाशांना पर्याय नाही. सकाळच्या सुमारास थोडेसे व्यवस्थित पाणी मिळते. नंतर, येणारे पाणी गढूळ असते. हे पाणी घरात ठेवल्यावर काही वेळातच लालसर बनते. शिवाय, हे पाणी दुर्गंधीयुक्त आहे. नाइलाजास्तव ते प्यावे लागते. या पाण्याने कावीळ होते, पोटाचे दुखणे जडते, अशा तक्र ारी आहेत.
जीव जगवायचा, तर हे पाणी प्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रि या ज्येष्ठ महिला विसुरी उंबरखांडे या महिलेने दिली. तुम्हाला पाणी मिळत नाही, तर तुम्ही तक्र ार का करत नाही, असे विचारले असता महिलांनी सांगितले की, याबाबत कोणास तक्र ार करायची तेच आम्हाला माहीत नाही. जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून ३०१ कोटींची पाणीयोजना घोडबंदरसाठी तयार करण्यात आली होती.
>पाणीप्रश्न सुटणार तरी कधी? : येथील प्रस्तावित पाणीयोजनेसाठी निधी मिळाला नसल्याने आता अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच प्रशासनदेखील योजनेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. साकेतवरून सव्वाचार मीटर रु ंदीची पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. हे काम होऊन पाणी वितरण व्यवस्था सुधारली तरच घोडबंदरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.