आदिवासी पँथरच्या कार्यकर्त्यांनी अडविला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा
By admin | Published: August 4, 2014 12:52 AM2014-08-04T00:52:40+5:302014-08-04T20:33:20+5:30
आदिवासी पँथरच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा रविवारी अकोल्यात अडविला.
अकोला: आदिवासींच्या एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी पँथरच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा रविवारी अकोल्यात अडविला. पोलिसांनी दलित पँथरचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बाजूला सारून रस्ता मोकळा केल्यानंतर उपमुख्यमंत्री मार्गस्थ झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास शिवणी विमानतळावर आले. ते लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेले. बैठक आटोपून १0.४५ वाजता मराठा मंडळ कार्यालयाकडे जात असताना, अकोल्यातील अशोक वाटीकेजवळ आदिवासी पँथरच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला; परंतू अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करून पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने कार्यकर्त्यांना बाजूला केले. कोतवाली पोलिसांनी आदिवासी पँथरचे १५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. आदिवासी पँथरचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सोळंके, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक गजानन चव्हाण, तुळशीदास सोळंके, गजानन डाबेराव, गजानन पवार, सुधाकर चव्हाण, रणजीत पवार, बाळाभाऊ सोळंके, संग्राम सोळंके आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.