आदिवासी विद्यार्थ्यांना आता मायबोलीतून शिक्षण, माडिया भाषेत अभ्यासक्रम तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:00 AM2018-12-28T06:00:35+5:302018-12-28T06:00:44+5:30
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे.
- दिगांबर जवादेे
गडचिरोली : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता माडिया व मराठी या दोन भाषांतून शिकविले जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली.
आदिवासी समाज जंगलात व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. या भागातील नागरिकांचा ग्रामीण भागाशी संपर्क येत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी व नागरिक माडिया मातृभाषेशिवाय इतर भाषा बोलत नाहीत व जाणतसुद्धा नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मराठीतून शिकविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.
शिक्षक मराठी बोलतो. मात्र विद्यार्थ्यांना यातील काहीच कळत नाही. याचा परिणाम म्हणजे हे विद्यार्थी हुशार असूनही चाचण्यांमध्ये ते मागे पडतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसºया वर्गाच्या अभ्यासक्रमाचे माडिया भाषेत भाषांतर केले आहे. केवळ माडिया भाषेत या विद्यार्थ्यांना शिकविल्यास भविष्यात हे विद्यार्थी मराठी भाषा जाणणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना माडिया व मराठी या दोन्ही भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे. परिणामी हे विद्यार्थी मराठी भाषासुद्धा शिकणार आहेत.
दोन भाषेतून शिकविताना शिक्षकांना चांगलीच तारेवरची कसरत होणार आहे. सर्वप्रथम त्यांना माडिया भाषा शिकावी लागणार आहे. शिक्षकांनी अध्यापन कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षणसुद्धा भामरागड येथे २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित केले आहे.
माडिया, गोंडी या आदिवासींच्या बोलीभाषा
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांना जोडल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात तेलगू, बंगाली, छत्तीसगडी, माडिया, गोंडी, हिंदी व मराठी या भाषा बोलल्या जातात. यातील माडिया व गोंडी ही आदिवासींची भाषा आहे.