आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर केला स्वयंपाक
By admin | Published: July 25, 2016 05:10 AM2016-07-25T05:10:25+5:302016-07-25T05:10:25+5:30
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील आदिवासी मुला- मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थ्यांची
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील आदिवासी मुला- मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंजूर झालेली नाही. तसेच भोजन कंत्राटाचे दर मंजूर झाले नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वसतीगृहाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रविवारी वसतीगृहासमोर रस्त्यावर स्वत:च स्वयंपाक शिजवून भोजन केले.
यावर्षी महाविद्यालये २७ जूनपासून सुरू झाल्यानंतर अनेक जुने विद्यार्थी वसतिगृहात राहायला आले. २१ जुलैपर्यंत सर्व सुरळीत होते. मात्र अचानक प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूचनेवरून लांझेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी १४ मुलींना वसतिगृहाबाहेर काढले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शुक्रवारच्या रात्री १४ मुलींना वसतिगृहात ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर शनिवारी सकाळी वसतिगृहातील मुला-मुलींना भोजन देण्यात आले नाही.
वसतिगृहातील जुन्या व नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंजूर झालेली नाही. तसेच भोजन कंत्राटाचे दर मंजूर झाले नाही, असे सांगून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने वसतिगृहातील सर्व मुला- मुलींना स्वगावी परतण्यास सांगण्यात आले. चारही वसतीगृह बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांनी गडचिरोलीचे आ. डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर आ. डॉ. होळी यांनी पोटेगाव मार्गावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नधान्य, भांडी व गॅस शेगडी उपलब्ध करून दिले. मात्र प्रकल्प कार्यालयाकडून वसतीगृहात भोजन तयार करण्याची मनाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला. वसतीगृहात राहण्यास प्रकल्प कार्यालयाने मनाई केल्यामुळे अनेक विद्यार्थी स्वगावी परतले आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)