तृतीय श्रेणी कर्मचा-यांचे समायोजन चतुर्थ श्रेणीत
By admin | Published: August 27, 2015 11:57 PM2015-08-27T23:57:34+5:302015-08-27T23:57:34+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रयोगशाळेतील परिचरांचा लढा सुरू
अकोला : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी २0१३मध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला. परंतु, या आकृतीबंधात तृतीय श्रेणीतील प्रयोगशाळा परिचरांचे समायोजन चतुर्थ श्रेणीत करण्यात येत आहे. याविरोधात राज्यातील १५ हजार ७00 प्रयोगशाळा परिचरांनी संघर्ष सुरू केला आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रयोगशाळा परिचर हे पद अतिरिक्त दाखविण्यात आले असून या कर्मचार्यांना नवृत्त होईपर्यंत सेवेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ते पद आपोआप व्यपगत होणार असल्याचे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. परंतु, सुधारित आकृतीबंधामुळे या कर्मचार्यांना चतुर्थ श्रेणीत मोडण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता सुधारित आकृतीबंधाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीसाठी जबरदस्ती न करण्याचा निर्णय दिला असल्याचे संघटनेचे राज्य महासचिव यांनी सांगितले आहे. प्रयोगशाळा परिचर पदाबाबत राज्य शासनाने विशेष समिती नेमली असून, येत्या काही दिवसांतच यावर निर्णय होणार आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य महासचिव भरत जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शाळांमध्ये प्रयोगशाळा सहायक व परिचर पद अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करून राज्य शासनाच्या समितीमध्ये माझा समावेश असून, समितीच्या अहवालामध्ये हे पद पूर्वीच्या वेतनश्रेणीवरच कायम ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचे सांगीतले.