"स्वाभिमान"मुळे अडला नारायण राणेंचा भाजपाप्रवेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 04:14 PM2017-05-09T16:14:43+5:302017-05-09T17:08:23+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप त्यांचा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबाच चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. दिव्य मराठीच्या वृत्तानुसार राणेंचा भाजपाप्रवेश स्वाभिमान संघटनामुळे रखडला आहे. राणेंचे पुत्र आमदार नितेश यांची स्वाभिमान संघटना बरखास्त केली तरच राणे व त्यांच्या पुत्रांना पक्षप्रवेश दिला जाईल, अशी एक अट भाजपने घातल्याचे वृत्त दिव्य मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मात्र, भाजपाने घातलेली ही अट राणेंना मान्य नाही. दुसरीकडे राणेंनीही आपले पुत्र माजी खासदार नीलेश यांना राज्यसभेची उमेदवारी आणि आमदार नितेश यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. या दोन्ही मागण्या भाजपने धुडकावून लावल्या आहेत. या अटी-शर्थींच्या वादातच राणेंचा भाजप प्रवेश लांबला आहे.
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे यांनी पुत्र नीलेश यांच्यासह गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. राणे यांनी या वृत्ताचे खंडण केले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणे पितापुत्रांचे एका गाडीतील फोटो वृत्तवाहिन्यांवर झळकले आहेत.
राणे यांनी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत फक्त एका सभेला हजेरी लावली. होती. अधिवेशन काळातही त्यांनी भाजपावर टोकाची टीका केली नाही. पण दिल्लीत जाऊन मात्र त्यांनी राहूल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरुध्दच्या तक्रारींचा पाढा वाचला.
काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किमान १० आमदार भाजपात आणण्याची अट भाजपा नेतृत्वाने राणे यांना घातली असून, या अटीच्या पूर्ततेनंतरच त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.