पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Published: June 24, 2016 01:47 AM2016-06-24T01:47:23+5:302016-06-24T01:47:23+5:30
संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. शहरात विभागवार चोवीस तास पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. इंद्रायणी घाटासह शहरातील प्रमख वर्दळीच्या रस्त्यांवर सुमारे ७५ लाख रुपये निधीतून एलईडी दिवे नव्याने बसविण्यात येत आहेत.
पोलीस प्रशासनाकडून शनिवारपासून अवजड वाहनांना आळंदीतून प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात प्रमुख मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ते परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असणार आहेत. बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेतच शंभराच्यावर पोलीस नेमण्यात आले असून, ते शनिवारपासून आळंदीत बंदोबस्त पाहणार आहेत.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, वीस पोलीस निरीक्षक, साठ पोलीस उपनिरीक्षक, पाचशे पोलीस जवान व महिला, चारशे होमगार्ड, गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व वीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. वारीकाळात ‘स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, थर्माकोल पत्रावळी, प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक शहरातील व्यापऱ्यांकडील प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या पत्रावळी जप्त करणार आहे.
भाविक-वारकऱ्यांनी कागदी पत्रावळीचा वापर करावा, शहरात उघड्यावर कचरा न टाकता पालिकेच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी पालिकेने जादा कर्मचारी नेमले आहेत.
रात्रीच्या वेळी गर्दी नसेल तेव्हा रस्त्यावरील कचरा उचलला जाणार आहे. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरात विविध चौदा ठिकाणी सुमारे साडेपाचशे शौचालये उभी केली आहेत.
याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदा तात्पुरती, फायबरची पाचशे शौचालये उभारण्यात येत आहेत. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्था काम करणार आहेत. वारीकाळात शौचालये मोफत ठेवली जाणार आहेत.
वारीकाळात येत्या २५ तारखेपासून पिंपरी महापालिकेचे पिण्याचे पाणी देहूफाटा, काळेवाडी परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येईल. (वार्ताहर)