एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई सुरूच, ९३८४ निलंबित, १९८० जणांची सेवासमाप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:52 AM2021-12-04T10:52:00+5:302021-12-04T10:52:23+5:30
ST Workers Strike: राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली
मुंबई : राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली असून, शुक्रवारी तब्बल १९२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले, तर १९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्यात ४५० कोटीचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत राज्यातील विविध मार्गावर एक हजार ३८२ एसटी धावल्या. त्यामध्ये २११ शिवशाही, ७८ शिवनेरी आणि १०९३ साध्या गाड्यांचा समावेश आहे, तर १८ हजार ८२८ कर्मचारी कामावर रुजू झाले. यामध्ये २१२४ चालक, तर २,२९४ वाहकांचा समावेश आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी मागील ३५ दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीही काही कर्मचारी संप करत आहेत.