प्रशासनाचा आठवड्यातून एकदा खादी डे

By admin | Published: May 21, 2016 05:34 AM2016-05-21T05:34:00+5:302016-05-21T05:34:00+5:30

राज्यातील सचिवस्तरीय अधिकारी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कामावर येणार आहेत.

Administration khadi de au once a week | प्रशासनाचा आठवड्यातून एकदा खादी डे

प्रशासनाचा आठवड्यातून एकदा खादी डे

Next

यदु जोशी,

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये खादी वापरण्याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सचिवस्तरीय अधिकारी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कामावर येणार आहेत. पुढील आठवड्यापासून स्वत: मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत.
यासंदर्भात क्षत्रिय यांनी गुरुवारी सचिवांची बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण सर्वांनी किमान आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते स्वत:देखील आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालणार असल्याचे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. त्यावर सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र सरकारने विविध राज्यांच्या राज्यपालांना खादीबाबत आवाहन करणारे पत्र पाठविले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना आलेले पत्र शासनाकडे पाठविले असून प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेतली. राज्याच्या प्रशासनाचे कर्णधारच खादी घालणार म्हटल्यानंतर आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी त्याचे अनुकरण करतील आणि आठवड्यातून एक दिवस का होईना पण खादीमय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आश्रमशाळेत मुक्काम
निवासी आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीला आता लवकरच मोठ्ठे साहेब येणार आहेत. ते साहेब त्यांच्याबरोबर जेवतील, राहतील आणि संवादही साधतील.
मुख्य सचिवांसह अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव हे एक दिवस या आश्रमशाळांत घालविणार आहेत. लवकरच त्याचे वेळापत्रक ठरेल.
मुख्य सचिवांसह विविध विभागांचे सचिव येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद, खासगी शाळांमध्ये एक दिवस व्यतित करणार आहेत.
तेथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या अडचणी समजावून घेऊन तसा अहवाल मुख्य सचिवांना सादर करतील.
-आठवड्यातून एक दिवस खादी वापरण्याची सक्ती केलेली नाही. हा निर्णय ऐच्छिक आणि स्वयंस्फूर्त आहे. सचिवस्तरीय अधिकारी थेट विद्यार्थ्यांसोबत जाऊन राहिल्याने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. सरकार शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेकडे किती गांभीर्याने पाहते हे तर दिसेलच पण शैक्षणिक सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे.
- स्वाधिन क्षत्रिय, राज्याचे मुख्य सचिव

Web Title: Administration khadi de au once a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.