प्रशासन सुस्त दशरथनगर त्रस्त

By admin | Published: August 6, 2014 01:16 AM2014-08-06T01:16:09+5:302014-08-06T01:16:09+5:30

दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी

Administration lax dasharathnagar stricken | प्रशासन सुस्त दशरथनगर त्रस्त

प्रशासन सुस्त दशरथनगर त्रस्त

Next

लोकांचा जीव मुठीत : पावसाने वाढविली चिंता
नागपूर : दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित करून, येथेही पुणे जिल्ह्यातील माळीणसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली दिसून येत नाही. मंगळवारी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.
शिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांनी या वस्तीला भेट देऊ न येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. यावरून स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेविषयी किती दक्ष आहे, याचा परिचय मिळतो. माळीण प्रमाणेच गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या वस्त्या दहशतीत जगत आहे.
गत दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने येथील लोकांची पुन्हा चिंता वाढविली आहे. रामदेवबाबा पहाडीच्या अगदी पायथ्याशी या दोन्ही वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यासह पहाडीवरील मोठमोठे दगड व दरड या वस्त्यांमधील घरांवर कोसळतात.
यात आजपर्यंत येथील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र येथील प्रत्येक नागरिक हा जीव मुठीत धरून जगत आहे.
पुणे जिल्ह्यातील माळीण येथील घटनेत १५० हून अधिक लोकांचे जीव गेले. तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. मात्र आजवर कोणतीही दुर्घटना झाली नव्हती.
परंतु यंदा अचानक निसर्ग कोपला, दरडी कोसळल्या आणि अख्खे गाव दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. त्यात नक्की किती लोक गाडल्या गेले, याचा अजूनपर्यंतही आकडा पुढे येऊ शकलेला नाही. नागपूर शहरातसुद्धा माळीणसारख्याच अनेक वस्त्या पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत.
त्यामुळे अशा धोकादायक वस्त्यांचे ‘माळीण’ होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने सजग होण्याची गरज आहे. मात्र सुस्त प्रशासन कदाचित मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा करीत असावे, असे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Administration lax dasharathnagar stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.