‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

By admin | Published: June 22, 2016 12:45 AM2016-06-22T00:45:22+5:302016-06-22T00:45:22+5:30

महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते.

The administration of the 'Lokmat' woke up the administration | ‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

Next

पिंपरी : महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. यामुळे या दोन्ही विभागांचे कार्यालय मंगळवारी कार्यालयीन वेळेतच बंद करण्यात आले. तसेच संत तुकाराममहाराज यांच्या अभंगाचे दृकश्राव्य करण्यासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केली होती. याबाबतही ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन महापालिकेला हा ठराव रद्द करावा लागला. नव्याने ठराव करून यासाठी ५ लाखांचीच तरतूद करावी लागली. ‘लोकमत’च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली.

कार्यालयांना वेळेतच टाळे

पिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात नियमबाह्य कामे कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याबाबत लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. यासह महापौरांनीही कारवाईचे आदेश दिले. लोकमतच्या या दणक्यानंतर आता या दोन्ही विभागांच्या कार्यालयांना सहा वाजताच ‘टाळे’ लागत आहे.
बांधकाम परवानगी आणि नगररचना या विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशा नियमबाह्य कामांना सायंकाळनंतर सुरुवात होते. यावर आधारित ‘फाइल मंजुरीसाठी रात्रीस खेळ चाले’ हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. यानंतर महापालिका प्रशासन हडबडले. सोमवारच्या महासभेतही या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी सभागृहात लोकमतच्या वृत्ताचे वाचन करीत या विभागाच्या कामकाजाची चौकशी मागणी केली. महापौरांनीही या दोन विभागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

मनसेचे टाळ बजावो आंदोलन
पिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थायी समितीच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टाळ बजावो आंदोलन केले.
याबाबत मनसेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग दृकश्राव्य पद्धतीने सोशल मीडियावर तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली स्थायी समितीने प्रस्तावावर पाच लाख रुपये खर्च दाखवून पन्नास लाखांच्या खर्चास मंजुरी घेतली. ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करू नयेत, अशी मागणी करण्यात आली.
यासह स्थायी समितीच्या या गैरकारभाराच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतींचे कार्यालय तसेच आयुक्त कार्यालयासमोर टाळ बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रूपेश पटेकर, अंकुश तापकीर, मयूर चिंचवडे, राजू सावळे, तानाजी चांदणे, ज्योती गोफणे आदींचा समावेश होता. तुकोबारायांचे अभंग दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख लाटणाऱ्या शब्द क्रिएशन या संस्थेला दिलेले काम रद्द करावे, अशी मागणी धनंजय आल्हाट यांनी आयुक्तांकडे केली आहे.


पाच लाखांचे ५० लाख करण्याचा डाव फसला
पिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाखांचा विषय स्थायीने मंजूर करवून घेतला आहे. हा गैरकारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीने अखेर हा चुकीचा ठराव रद्द करणे भाग पडले. यामुळे पाच लाख खर्चाचा प्रस्ताव दाखवून ५० लाख रुपये लाटण्याचा स्थायी समितीचा डाव फसला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा मोबाइलद्वारे तसेच डिजिटल मीडियाद्वारे ऐकावयास मिळावी, यासाठी अभंगगाथा दृक्श्राव्य करण्यासाठीच्या विषयास १४ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४५८६ अभंग निवडले. मात्र, या प्रस्तावाच्या खर्चाचे आकडे अक्षरी व अंकी यात तफावत होती. ही बाब लोकमतने दिलेल्या वृत्ताने सर्वांच्या निदर्शनास आली. या प्रस्तावास कडाडून विरोध झाला. त्यामुळे पन्नास लाखांचा प्रस्ताव पाच लाखांवर आला. अखेर अभंग दृकश्राव्य करण्यासाठी येणाऱ्या पाच लाखांचा नवीन ठराव करून मंजूर करण्यात आला.


अगोदरच्या ठरावात प्रत्येक अभंगाचे ध्वनिमुद्रण, ध्वनिसंपादन, स्टुडिओ रेंटसाठी ४०० रुपये, तसेच प्रत्येक अभंगासाठी कलाकारास मानधन म्हणून तीनशे रुपये, व्हिडीओ संपादनासाठी प्रत्येकी तीनशे रुपये, तसेच प्रूफरिडिंगसाठी प्रतिअभंग ११० रुपये असे एकूण एका अभंगासाठी एक हजार ११० रुपये खर्च येत असून, चार हजार ५८६ अभंगांसाठी ५ लाख ९ हजार ४६० रुपये खर्च दाखविण्यात आला होता. अभंगांची संख्या पाहता ही रक्कम पन्नास लाखांवर जात होती. (प्रतिनिधी)

Web Title: The administration of the 'Lokmat' woke up the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.