प्रतीक्षा प्रभागांच्या प्रशासकीय रचनेची

By admin | Published: March 2, 2017 12:53 AM2017-03-02T00:53:29+5:302017-03-02T00:53:29+5:30

निवडणुकीनंतर आता पालिका प्रशासन नव्या प्रभागांच्या प्रशासकीय रचनेच्या प्रतीक्षेत आहे.

Administrative structure of the waiting wards | प्रतीक्षा प्रभागांच्या प्रशासकीय रचनेची

प्रतीक्षा प्रभागांच्या प्रशासकीय रचनेची

Next


पुणे : निवडणुकीनंतर आता पालिका प्रशासन नव्या प्रभागांच्या प्रशासकीय रचनेच्या प्रतीक्षेत आहे. जुनी दोन सदस्यीय प्रभागांची रचना आता पूर्ण बदलावी लागणार असून, चार सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयांचीही रचना नव्याने करावी लागणार आहे. भौगोलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या यांमुळे परिमंडळांच्या रचनेतही बदल होईल. पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे या रचनेवरही त्यांचाच वरचष्मा राहणार आहे.
यापूर्वीची प्रशासकीय रचना १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दोन सदस्यांचे ७६ प्रभाग याप्रमाणे करण्यात आली होती. आता चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे १६२ सदस्यांचे ४१ प्रभाग झाले आहेत. त्यांची भौगोलिक रचना पूर्वीच्या प्रभागांच्या तुलनेत एकदम बदलली आहे. त्यामुळेच कोणते प्रभाग कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत व कोणती क्षेत्रीय कार्यालये कोणत्या परिमंडळ विभागात टाकायची याची रचना नव्याने करावी लागणार आहे. रचनेबरोबरच त्यासाठी शाखा अभियंत्यांपासून ते थेट शिपायांपर्यंत सर्वच रचना बदलली जाणार आहे.
चार सदस्यांचा प्रभाग करताना त्यांचे भौगोलिक क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीने तोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रभागांचे क्रमांक व त्यांच्या सीमा यात तफावत आहे. भौगोलिक क्षेत्र प्रमाण मानून रचना केली, तर वेगवेगळ्या क्रमांकांचे प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीत येण्याची शक्यता आहे. क्रमांक प्रमाण मानून रचना केली, तर भौगोलिक क्षेत्र विभागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना त्यांचे प्रभाग निश्चित करून देताना, याचा सुवर्णमध्य काढला जाईल, असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागांची मिळून प्रभाग समिती असते. त्या प्रभागातील नगरसेवक, तीन अराजकीय सदस्य, तसेच त्या क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता यांचा प्रभाग समितीत समावेश असतो. क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख असलेले सहायक आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतात. अध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून केली जाते. बहुसंख्य नगरसेवक भाजपाचेच असल्यामुळे या समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे अंदाजपत्रक ठरविण्याचा महत्त्वाचा अधिकार प्रभाग समितीला असतो. त्याशिवाय कोणती कामे प्राधान्याने करायची, कामे प्रस्तावित कशी करायची, याचेही अधिकार समितीलाच आहेत.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २५ लाख रुपयांच्या आतील कामे आयुक्तांकडे न नेता, करण्याचा निर्णय समिती घेऊ शकते.(प्रतिनिधी)
>जुन्या २ सदस्यांच्या प्रभाग रचनेत काम करता येणे शक्य नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त नवी रचना कधी होते याच्या प्रतीक्षेत आहेत.यापूर्वीची सर्व म्हणजे, १५ क्षेत्रीय कार्यालये सहआयुक्तांच्या अखत्यारीत असलेल्या ४ परिमंडळ कार्यालयांमध्ये विभागण्यात आली होती.
आता ४१ प्रभाग असल्यामुळे १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी २ याप्रमाणे प्रभाग देण्यात येतील. तसे ३० प्रभाग होतात. उर्वरित ११ प्रभाग पुन्हा प्रत्येकी एक याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांना
दिले जातील. ४ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी २ च प्रभाग असतील.
सर्वसाधारणपणे एका क्षेत्रीय कार्यालयाला ३ प्रभाग म्हणजे, १२ नगरसेवक असतील. १२ नगरसेवक ३ अराजकीय सदस्य, सहायक आयुक्त व शाखा अभियंता, अशी १७ सदस्यांची प्रभाग समिती असेल. नगरसेवक सदस्यांपैकी एकाची बहुमताने अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल.

ही रचना करण्याचे अधिकार आयुक्तांना असतात. निवडणुकीचेच कामकाज सुरू असल्यामुळे या गोष्टींकडे आयुक्तांनी लक्ष दिले नव्हते.
आता निवडणुकीचे कामकाज संपून नवे सभागृह अस्तित्वात येत असल्याने आयुक्तांनी या रचनेसंबधी प्राथमिक काम करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Administrative structure of the waiting wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.