‘वालचंद’वर प्रशासक मंडळ

By Admin | Published: July 9, 2017 12:11 AM2017-07-09T00:11:19+5:302017-07-09T00:20:10+5:30

उद्यापासून ताबा : व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त

Administrator's board on 'Walchand' | ‘वालचंद’वर प्रशासक मंडळ

‘वालचंद’वर प्रशासक मंडळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे शासनाने महाविद्यालयावर प्रशासक मंडळ नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने महाविद्यालयासह राजकीय गोटात खळबळ माजली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला वालचंद महाविद्यालयातील वाद राज्याच्या राजकीय पटलावरही गाजला. अनेक तक्रारी शासनस्तरावर करण्यात आल्या. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्र व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेअंती प्रशासक मंडळ नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाला ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या, सोमवारी हे मंडळ पदभार घेणार आहे. या वादावर निकाल होईपर्यंत महाविद्यालयासंदर्भात सर्व कामकाज, निर्णयाचे अधिकार या मंडळाला दिले आहेत.
त्यामुळे यापुढे वालचंद महाविद्यालयात प्रशासकराज सुरू होणार आहे. मालकी वादात सुरुवातीला अराजकीय व्यक्तींचा संघर्ष सुरू होता. त्यानंतर त्यात राजकीय लोकांच्या प्रवेशामुळे वादाने आणखी पेट घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वालचंद प्रश्नावरून वाद रंगला आहे. हे दोन्ही नेते दोन वेगवेगळ्या गटाचे नेतृत्व करीत आहेत.
प्रशासक मंडळाचे सदस्य भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, महाविद्यालयाच्या मालकी आणि कामकाजावरून वालचंद ट्रस्टचे अजित गुलाबचंद, त्यांनी नियुक्त केलेले व्यवस्थापकीय मंडळ आणि एमटीई सोसायटी यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम महाविद्यालयाच्या कामकाजावर झाला आहे. देशात नावलौकिक असलेल्या या महाविद्यालयातील वाद चर्चेचा विषय ठरला होता.
गेल्या पाच-सहा वर्षांत तर या महाविद्यालयाची प्रगती थांबली आहे. अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत येथील मंजूर संख्या वाढविण्यापासून ते कामकाज, विकासात्मक कामावर परिणाम झाला आहे. यातून विद्यार्थी, शिक्षकांच्याही मनात संभ्रम निर्माण झाला आहे. इमारत, वसतिगृह, प्रयोगशाळेपासून ते क्रीडांगणापर्यंत सवार्चीच दुरवस्था झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. उलट हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने संस्था बदनाम होऊ लागली आहे.
ते म्हणाले की, दोन गटातील संघर्षात महाविद्यालयाचे संभाव््य नुकसान टाळण्यासाठीच फडणवीस व तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे. या वादावर न्यायालयाकडूनच तोडगा निघेपर्यंत शासनाकडूनच प्रशासक मंडळ नेमून कामकाज पाहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी देण्यात आले असले तरी सोमवारी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नाईक हे सांगलीत येणार आहेत. त्यांच्यासह समिती महाविद्यालयाचा ताबा घेणार आहे.


अशी आहे कमिटी
महाराष्ट्र टेक्निकल बोर्डचे सहसंचालक प्रमोद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तीनजणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी नियुक्त केलेले मकरंद देशपांडे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून, ते दुसरे सदस्य आहेत. एआयसीटी दिल्लीचे प्रतिनिधी तिसरे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.


निर्णय मान्य : देशमुख
एमटीई सोसायटीचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, शासनाने ‘वालचंद’बाबतचा जो निर्णय घेतलेला आहे, तो मान्य आहे. याबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आम्ही कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. प्रशासक मंडळाला आवश्यक ते सर्व सहकार्य करू.


माहिती घेऊन भूमिका : संजयकाका पाटील
यासंदर्भात मला काहीही माहिती नाही. शासनाने काय निर्णय घेतला आहे याची माहिती घेऊन योग्य ती भूमिका जाहीर करू, असे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

Web Title: Administrator's board on 'Walchand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.