पहिल्या दिवशी ६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
By admin | Published: June 28, 2016 12:51 AM2016-06-28T00:51:26+5:302016-06-28T00:51:26+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली असली तरी पहिल्या दिवशी केवळ ६ हजार ३९९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सोमवारी अकरावी प्रवेशास थंड प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रवेश मिळूनही ५० रुपये शुल्क न भरून आपला प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना येत्या ३० जूनपर्यंत प्रवेश घ्यावाच लागणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ७३ हजार ३८५ जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून आॅनलाइन प्रवेशासाठी ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी सकाळी १०.३० वाजता जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीतून ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतला. तब्बल ४६ हजार १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रतिसाद दिला नाही.
सर्व विद्यार्थ्यांना केवळ आॅनलाइनच प्रवेश दिले जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थी आॅफलाइनने प्रवेश घेण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी आॅनलाइन प्रवेशास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, शहरातील काही नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती.
फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी स्वतंत्र वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून मगच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.
गरवारे, एस. पी. कॉलेज व मॉडर्न महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. काही महाविद्यालयात प्रवेश शुल्क भरण्यासाठी रांगा लागल्या
होत्या. (प्रतिनिधी)
>आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया
गेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिला जाणार आहे.
शिक्षण विभागाकडून अकरावीचा आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला होता. तरीही काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयात सोमवारी तीन सुशिक्षित पालक आले होते. आमच्याकडून मुलाचा आॅनलाइन अर्ज भरायचा राहून गेला. आता आम्हाला प्रवेश कसा मिळेल, याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यामुळे यंदाही आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.