भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:45 PM2019-08-03T16:45:49+5:302019-08-03T16:46:04+5:30
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर राज्यातील भाजप देखील मजबूत झाले आहे. तर विरोधी पक्षांची वाताहत झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विरोधीपक्षात राहून काम करण्यास अनेक नेते तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यातच साताऱ्याचे राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील पक्षांतर केले आहे. छत्रपती उदयनराजे यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात परिचीत आहे. परंतु, आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे राज्यभरात परिचीत झाले आहेत.
खासदार उदयनराजे यांची स्थानिक राजकारणातील ढवळाढवळ यामुळे आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी स्पष्ट केले. परंतु, राष्ट्रवादीतून निवडून येण्याचे दिवसे गेल्याचे नमूद करत त्यांनी भाजपचं वर्चस्व मान्यच केले. परंतु, पक्षांतराच्या निर्णयामुळे शिवेंद्रसिंहराजे राज्यात प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत केवळ सातारा आणि फारफार तर पश्चिम महाराष्ट्रात परिचीत असलेले शिवेंद्रसिंहराजे आता महाराष्ट्रात परिचीत झाले. बहुतांशी लोकांना याआधी फक्त उदयनराजे ठावूक होते.
उदयनराजे राजकारणात सक्रिय असल्यामुळे आणि त्यांचा बिनधास्त अंदाज सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर छत्रपती संभाजी राजे देखील मागील काही वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आले. मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत काढलेली शिव-शाहू यात्रा छत्रपती संभाजी राजे यांना महाराष्ट्रात पोहचविण्यात फायदेशीर ठरली. त्यानंतर संभाजी महाराज यांना राज्यसभेवर घेण्यात आले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी सरकार आणि मराठा मोर्चेकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली होती.
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे साताऱ्यांत दोन राजांमधील चुरस पाहायला मिळणार आहे.