लग्नाचा खर्च टाळून १४ मुलांना शिक्षिकेने घेतले दत्तक
By admin | Published: March 31, 2017 02:12 AM2017-03-31T02:12:22+5:302017-03-31T02:12:22+5:30
विवाह समारंभाचा खर्च टाळून येथील शाळेच्या उपशिक्षिकेने अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
प्रशांत ननवरे / बारामती
विवाह समारंभाचा खर्च टाळून येथील शाळेच्या उपशिक्षिकेने अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या उपशिक्षिका प्रियांका पवार यांनी हा आदर्श वस्तुपाठ मांडला आहे.
शिक्षण घेताना स्वत:च्या वाट्याला आलेली परिस्थिती इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी पवार यांनी हा निर्णय घेतला. त्याला त्यांच्या जीवनसाथीने सहमती दर्शविली. त्यानंतर पवार यांनी आपल्या विद्यालयातील १४ अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. त्यासाठी साधेपणानेच त्यांनी विवाह केला.
प्रियांका पवार व कडेगाव (जि. सांगली) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक अमोल कदम या नवदांपत्याचा विवाह गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नुकताच पार पडला. या दांपत्याने विवाहखर्चाला कात्री लावून व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च देऊन समाजासमोर नवविचारांची गुढी उभारण्याचेच काम केले आहे. कदम कुटुंबीय हे विवाहाची बोलणी करण्याकरिता पवार यांचेकडे आले. या वेळी अवघ्या ३ तासांत लग्नाची बैठक, सुपारी, साखरपुडा व तत्काळ लग्नाचा निर्णय घेतला. हा विवाह अत्यंत कमी खर्चात काटकसरीने संपन्न झाला. तर विवाहात आहेर भेट म्हणून आलेली रक्कमदेखील विद्यालयाला देण्याचा निर्णय पवार व कदम कुटुंबीयांनी घेतला. या विवाहप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य वसंत माने, पर्यवेक्षक संजय ढवाण, सूर्यकांत भालेराव, गणपतराव तावरे, वसंत मोरे याबरोबरच अनेक रयत सेवक उपस्थित होते.
(वार्ताहर)
माझे कुटुंब शेतकरी आहे. घरची परिस्थिती पहिल्यापासूनच बेताची होती. संघर्षातूनच शिक्षण, नोकरी मिळाली. प्रतिकूल परिस्थितीनेच मला घडविले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी माझ्या पतींनी प्रोत्साहन दिले. रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही त्यागातून झाली आहे. आपण या संस्थेत नोकरी करत आहोत. याची जाणीव ठेवून विवाहखर्चाची रक्कम अनाथ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला. विद्यार्थ्यांच्या मदतीचा हा वसा कायम जपणार आहे.
- प्रियंका पवार, वधू
माझे वडीलही रयत सेवक आहेत. त्यामुळे विवाह खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आम्हा दोन्ही कुटुंबांना अधिक आनंद होत आहे.
- अमोल कदम, वर