गोदरेजने दिलेली पर्यायी जागा बुलेट ट्रेनसाठी योग्य, एनएचएसआरसीएलची उच्च न्यायालयात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:31 AM2018-08-01T01:31:01+5:302018-08-01T01:32:07+5:30
अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.
मुंबई : अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.
गोदरेज कंपनीचा विक्रोळी येथील भूखंड बुलेट ट्रेनसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे होता. भूखंड संपादनाविरुद्ध गोदरेजने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत गोदरेजने प्राधिकरणाला पर्यायी जागा सुचविल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मंगळवारच्या सुनावणीत या जागेच्या मालकी हक्कावरून राज्य सरकार व गोदरेजमध्ये वाद असून त्यासंबंधीच्या दाव्यावरील सुनावणी उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती गोदरेजने दिली. मात्र, आणखी पर्यायी जागा प्राधिकरणाला सुचविली असून त्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गिकेत बदल होणार नाही, असे आश्वासनही दिले. त्यावर न्यायालयाने सरकारला गोदरेजने सुचविलेल्या पर्यायी जागेसंदर्भात मालकी हक्कावरून वाद नाहीत ना, याची माहिती काढण्यास सांगितले. तांत्रिक बाबींशिवाय पर्यावरणाचे नियम, खारफुटीचाही विचार करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.
अंतिम निर्णयासाठी तीन सप्टेंबरपर्यंत मुदत
अहमदाबाद-मुंबई या ५०८.१७ किलोमीटर ट्रॅकपैकी २१ किलोमीटर ट्रॅक भुयारी मार्गाने टाकण्यात येईल. हा भुयारी मार्ग विक्रोळी येथून जाणार आहे. त्यासाठी गोदरेजचा भूखंड संपादित करण्याचा प्राधिकरणाचा प्रस्ताव होता. मात्र, प्राधिकरणाने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, गोदरेजने सुचविलेला पर्यायी भूखंडही सकृतदर्शनी बुलेट ट्रेनसाठी योग्य आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्यावर न्यायालयाने प्राधिकरणाला त्यांचा अंतिम निर्णय ३ सप्टेंबरपर्यंत सांगण्याचे निर्देश दिले.