“गणपतीपुळे दत्तक घ्या अन् विकासकामे करा”; शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:57 IST2023-07-13T14:56:55+5:302023-07-13T14:57:20+5:30
Uddhav Thackeray News: गणपतीपुळे आणि परिसरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

“गणपतीपुळे दत्तक घ्या अन् विकासकामे करा”; शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
Uddhav Thackeray News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. राज्यातून अनेकांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळत आहे. हजारो शिवसैनिक आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, अशी ग्वाही देत आहेत. मात्र, यातच आता उद्धव ठाकरे यांनी गणपतीपुळे दत्तक घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विकासासाठी गणपतीपुळे दत्तक घ्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर मागणी गणपतीपुळे आणि परिसरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या शिवसैनिकांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गणपतीपुळेचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
१०२ कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्याला मंजुरी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, १०२ कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्याला मंजुरी दिली होती आणि याचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यानंतर परिसराचा विकास झाला नाही. त्यामुळे आता गणपतीपुळे दत्तक घ्यावे आणि विकासकामे करावीत, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.