आदर्श शिक्षकाकडून शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार
By admin | Published: May 8, 2016 09:02 PM2016-05-08T21:02:17+5:302016-05-08T21:02:17+5:30
जि. प. प्रा. शाळेतील प्राथमिक शिक्षक विलास ऊर्फ बापू मसरे याने इयत्ता चौथीच्या वर्गातील तीन मुलींवर तब्बल सात महिने लैंगिक अत्याचार केले
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8- मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे जि. प. प्रा. शाळेतील प्राथमिक शिक्षक विलास ऊर्फ बापू मसरे याने इयत्ता चौथीच्या वर्गातील तीन मुलींवर तब्बल सात महिने लैंगिक अत्याचार केले आहेत. हा प्रकार ऑगस्ट २0१५ पासून फेब्रुवारी २0१६ पर्यंत चालू होता. याबाबत एका पीडित मुलीच्या आईने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी विलास मसरे यास अटक केली आहे. त्याला रविवारी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे १९ वर्ष सेवा शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या विलास मसरे यास २0१३ साली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, १ मे २0१६ रोजी एका पीडित मुलीच्या घरी तिच्या दोन मैत्रिणीसह त्या गप्पा मारत होत्या. यावेळी शिक्षक कसा त्रास देत आहे, शिक्षक किती वाईट आहे, याबद्दलची चर्चा फिर्यादीने ऐकली. यावर तिने त्या सर्व मुलींशी चर्चा केली. त्यानंतर पतीबरोबर चर्चा करून तिने शनिवारी सकाळी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. कॉम्प्युटर रूममध्ये हा शिक्षक मुलींना बोलावून घेऊन कॉम्प्युटरवर गेम खेळण्यास देत होता. त्यानंतर मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. या मुली घाबरुन कुणालाच काही सांगत नव्हत्या. शेवटी हा प्रकार माहीत झाल्यानंतर मुलीच्या आई-वडिलाने मन खंबीर करून पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३७६ (२), (१), बाललैंगिक अत्याचार २0१२ कलम ५ (फ), ५ (एफ), ५ (एम) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हारुण शेख हे अधिक तपास करत आहेत.