"फडणवीस यांचं विधान बेजबाबदारपणाचं, अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 06:24 PM2021-11-21T18:24:20+5:302021-11-21T18:24:46+5:30

Yashomati Thakur on Devendra Fadnavis : यशोमती ठाकूर यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य.

adv yashomati thakur criticize devendra fadnavis on his amravati statement slams bjp | "फडणवीस यांचं विधान बेजबाबदारपणाचं, अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये"

"फडणवीस यांचं विधान बेजबाबदारपणाचं, अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये"

Next

"अमरावती येथील वातावरण बिघडण्याचा भाजपने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये," अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ॲड यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सूज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

"अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला या प्रसंगी शांतता हवीय हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवीय आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही," असंही ठाकूर म्हणाल्या. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचं वातावरण बिघडवायचं आहे असं दिसतंय. अमरावतीत १२ आणि १३ तारखेला घडलेल्या दोन्ही घटना तितक्याच दुर्दैवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे, इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा ही विशेष पथकामार्फत तपास सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.

"देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तेथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचं स्वागत केले आहे, पण अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचं आवाहन केलं असतं तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी या घटनेचं राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे," असंही त्या म्हणाल्या. आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे हे मान्य केलंय, मात्र याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफी ही त्यांनी मागीतली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केली. 

योग्य दखल घेतली 
"१२ तारीख आणि १३ तारखेच्या दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेलीय. कोणालाच सोडणार नाही ही सरकारची भूमिका आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत आहेत अशी टीका ही त्यांनी केली आहे. रझा अकादमी चे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गृहविभाग कारवाई करत आहे, त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसंच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात ही चर्चा केली जाईल," अशी माहिती ही ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

Web Title: adv yashomati thakur criticize devendra fadnavis on his amravati statement slams bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.