महा ई- सेवा केंद्रातून मिळणार एसटीचे आगाऊ आरक्षण
By Admin | Published: October 18, 2016 06:20 PM2016-10-18T18:20:55+5:302016-10-18T18:20:55+5:30
ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा- ई सेवा केंद्रातून विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 18 - ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा- ई सेवा केंद्रातून विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा लाभ राज्यातील जवळपास २० हजार ग्रामपंचायत क्षेत्रातील
जनतेला होणार आहे.
देशातील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी सणाची चाहुल सर्वांना लागली आहे. अनेक कुटूंबीयांनी दिवाळी कशी साजरी करायची, याबाबत आराखडा तयार केला आहे. तर काहींनी दुरच्या नातेवाईकांकडे दिवाळी साजरी करण्याचे
ठरविले आहे. यासाठी वेळेवर एसटीचे तिकिट मिळत नसल्यामुळे अनेकांची नाराजी होते. यासाठी एस.टी.महामंडळाने इंद्रधनू आरक्षण प्रणाली अंतर्गत महा ई सेवा केंद्रातून एसटी तिकिटाच्या आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे.
इंद्रधनु आरक्षण प्रणालीमुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर निपाणी, बेळगाव, कारवार, गोवा सारख्या महाराष्ट्राच्या सीमाभागातील प्रवाशांबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ तिकीट आरक्षीत करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात सध्या कार्यरत मे.महा आॅनलाईन लि. कंपनीच्या ५
हजार ८०० ई सेवा केंद्रातून प्रवाशांना आगाऊ आरक्षण तिकीट काढता येणार आहे.
संकेतस्थळावरही तिकीट आरक्षण..
त्याचप्रमाणे प्रवाशांना एसटी महामंडळाच्या संकेतस्थळाबरोबरच शासकीय संकेतस्थळावरुनही तिकिट आरक्षीत करता येईल. यासह प्रवाशाच्या इच्छित प्रवाशाचा मार्ग, एसटी बसेसच्या वेगवेगळ्या श्रेणीचे भाडेही जाणून घेता येणार आहे.