वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:19 AM2018-12-03T06:19:54+5:302018-12-03T06:20:04+5:30
मराठा समाजाला देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. वैद्यकीय प्रवेशांत (नीट) राज्यासाठीच्या कोट्यामध्येही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी सांगितले.
वैद्यकीय शासकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेअंतर्गत देश पातळीवर राज्यातील उमेदवारांकरिता राज्य कोट्यांतर्गत ८५ टक्के जागा राखीव असतात. आतापर्यंत वैद्यकीय किंवा उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात प्रवेश मिळू शकत नव्हता. त्यांच्यापैकी बºयाच जणांचा प्रगत वर्गात समावेश झाल्याने गुणवत्तेच्या कोट्यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या स्पर्धेतही मराठा समाज मागे पडला असल्याची खंत व्यक्त केली जात होती. मात्र आता राज्याच्या ८५ टक्के कोट्यांतर्गत १६ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. देशपातळीवरील उर्वरित १५ टक्के कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे शिणगारे यांनी स्पष्ट केले.
१६ टक्के आरक्षणाचा शासन निर्णय निघताच त्याची अंमलबजावणी होईल. उर्वरीत १५ टक्के देशपातळीवरील कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाºया जागांमध्ये त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तेथे स्पर्धा करावी लागेल, असेही शिणगारे म्हणाले.
>दरवर्षी २ लाख अर्ज
राज्यातून दरवर्षी २ लाखाहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशांसाठी अर्ज करतात. त्यामध्ये शासकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या एकूण ३११० जागा तर बीडीएसच्या २६० जागा यंदा उपलब्ध आहेत. खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या १७२० तर बीडीएसच्या २३५० जागा आहेत. या जागांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.