युतीच्या भांडणात विरोधकांचा लाभ
By admin | Published: May 17, 2016 03:26 AM2016-05-17T03:26:22+5:302016-05-17T03:26:22+5:30
शिवसेना भाजपा युतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हाती लागले आहे़
मुंबई : शिवसेना भाजपा युतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हाती लागले आहे़ पालिकेवर नियंत्रण ठेवणारे वांद्रे येथील साहेब आणि त्यांचे पीए कोण, असे जाहीर करण्याचे आव्हान भाजपाला देत, काँग्रेसने आज स्थायी समिती दणाणून सोडली़, तर युतीमधील वादाचा फटका येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना बसणार आहे, असा आरोप मनसेने केला आहे़
पालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा असून, वांद्रे येथील साहेब आणि त्यांच्या पीएचे कारभारावर नियंत्रण असल्याचा आरोप भाजपा नेत्याने केला आहे़ वांद्रे येथील साहेब व त्यांचा पीए कोण, असा उपरोधक सवाल विचारणारे फलक घेऊन काँगे्रसच्या सदस्यांनी पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनाबाहेर आज निदर्शने केली़
स्थायी समितीच्या बैठकीत यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी मागितली होती़ मात्र, शिवसेनेला अडचणीत आणणारा हा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी चर्चेला येऊ दिला नाही़ त्यामुळे काँग्रेसने निदर्शने सुरूच ठेवली़ या गोंधळातच स्थायीचे कामकाज आटोपण्यात आले़ (प्रतिनिधी)
शहर भागात नालेसफाई विलंबानेच
ेल्या बैठकीत रोखून धरलेला शहर भागातील नाल्यांच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला़ नाल्यांमधील गाळ कुठे टाकणार, हे नमूद नसल्याने प्रस्ताव रोखला होता़
मात्र, भिवंडी आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी गाळ टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाने आज स्पष्ट केले़ भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतरच हा प्रस्ताव थांबवून ठेवण्यात आला होता, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे़
मेट्रोला विरोध नाही़़़विस्थापितांचे काय
विकास नियंत्रण नियमावलीत मेट्रो व मोनोसारख्या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार पालिकेकडून काढून घेण्यात आला आहे़ याचा तीव्र विरोध शिवसेनेने केला होता़
मात्र, हा विरोध मेट्रो प्रकल्पाला नसून, यामुळे विस्थापित होणाऱ्या मराठी माणसासाठी असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली़
धारावीतील नालेसफाईचे
काम रेंगाळले - मनसे
गेल्या बैठकीत भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने नालेसफाईचा प्रस्ताव रोखून धरला़ यामुळे माहीम धारावी विभागातील नाल्यांच्या सफाईचे काम रेंगाळले आहे़
हा विभाग येत्या पावसाळ्यात जलमय झाल्यास, शिवसेना भाजपा त्यास जबाबदार असतील, असे जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष मनसेचे सुधीर जाधव म्हणाले.