कोल्हापुरी दणक्याने रंगाची ती जाहिरात अखेर मागे, ऋतुराज पाटील यांनी दिला होता इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:06 PM2020-08-26T18:06:47+5:302020-08-26T18:46:59+5:30
एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.
कोल्हापूर : एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.
Video: रंगाच्या कंपनीने कोल्हापूरला हिणवल्याने ऋतूराज पाटील आक्रमक; जाहिरात मागे घेण्याची मागणी https://t.co/YMzM10xy8B@ruturajdyp
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
कंपनीच्या या जाहिरातीत त्या घरातील चिंटूचे तीन मित्र त्याच्या घरी येतात व तुझे घर किती चमकत आहे! असे म्हणतात. लाईट लावल्यावर तर ते घर अधिकच उजळून निघते. त्यावर चिंटूचे मित्र त्यास तुझे घर इतके चांगेल आहे तर तुमच्याकडे पैसेही भरपूर असतील?अशी विचारणा करतात. त्यावर चिंटू होय, भरपूर पैसे असून आम्ही यंदा सिंगापूरला जाणार असल्याचे मोठ्या आविर्भावात मित्रांना सांगतो.
तेवढ्यात चिंटूचे वडील येतात व ते रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले असून आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगतात. त्यावर चिंटू प्रश्नार्थक नजरेने कोल्हापूर?... अशी विचारणा करतो. त्यावर त्याचे मित्र हसत-हसत कुचेष्टेने सिंगापूर असे सांगतात. त्यातून कोल्हापूरला हिणवल्याचे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे.
ही जाहिरात तातडीने मागे घेण्याची मागणी ऋतुराज पाटील यांनी कंपनीकडे ट्विटद्वारे केली होती. वृत्तवाहिन्यांनीही या जाहिरातीचे प्रसारण करू नये, असे आमदार पाटील यांनी म्हटले होते.
कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे पूर्ण पीठ आहे. कोल्हापूर कला-साहित्य, क्रीडापासून ते शेती, सिंचन अशा अनेक क्षेत्रांत देशात नावाजलेले शहर आहे. त्यामुळे ते सिंगापूरइतकेच महत्त्वाचे असल्याने कोल्हापूरची कुणी चेष्टा करू नये, असे त्यांनी म्हटले होते.
जाहिरातीविरोधात कोल्हापूरकरांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. शहरातील विविध ठिकाणी आज पेंटच्या जाहिराती विरोधात निदर्शने करण्यात आली. जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत कोल्हापुरात कंपनीचा एकही ट्रक येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या पोस्टारला काळे फासत घोषणाबाजी केली तर, कसबा बावडा येथील युवकांनी 'पेंट' कंपनीच्या रंगांच्या बादल्या रस्त्यावर ओतून 'त्या' जाहिरातीचा निषेध केला.
कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.यु ट्यूबवरून हा व्हीडिओ या कंपनीने काढून टाकला आहे. एका दिवसात दहा हजार कोल्हापूरकरांनी हा व्हीडिओ डिस्लाईक केला होता.