जाहिराती, डिजिटल मीडियाचा खुबीने वापर

By admin | Published: February 25, 2017 04:49 AM2017-02-25T04:49:45+5:302017-02-25T04:49:45+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली.

Advertising, Use of Digital Media | जाहिराती, डिजिटल मीडियाचा खुबीने वापर

जाहिराती, डिजिटल मीडियाचा खुबीने वापर

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली. हे करताना भाजपाने आपली पूर्ण शक्ती तर पणाला लावलीच; पण या विजयात जाहिरातींचा अत्यंत कौशल्याने केलेल्या वापराचाही मोठा वाटा होता.
मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जागा लढविलेल्या भाजपाने या वेळी तब्बल १९४ जागा लढविल्या. त्यामुळे १३१ वॉर्ड असे होते की जिथे भाजपा पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. युती तुटल्यानंतर प्रचारासाठी २० दिवसदेखील हाती नव्हते. ही बाब हेरून भाजपाच्या रणनीतीकारांनी जाहिरातींचा भक्कम आधार घेतला आणि त्यांची ही खेळी यशस्वीदेखील झाली.
इतक्या मोठ्या जागा लढायच्या म्हटले तर भाजपाकडे कार्यकर्त्यांचे नेटवर्क नव्हते. याबाबत शिवसेना मात्र उजवी होती. शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ ही जमेची बाजू होती. त्यावर मात करण्याचे आव्हान भाजपासमोर होते. ही कमतरता भरून काढण्याचे काम जाहिरातींनी केले. कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन जाहिरातींच्या माध्यमातून परिणाम साधण्याचे काम कौशल्याने करण्यात आले. २०१२च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ६५ जागा लढविल्या आणि त्यातील ३१ जिंकल्या होत्या. या वेळी शिवसेनेशी युती नव्हती आणि शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविण्याचे आव्हान होते. जाहिरातीचे तंत्र भाजपासाठी धावून आले. वृत्तपत्रे, चॅनेल्स, होर्डिंग्ज आणि डिजिटल मीडियातून भाजपाच्या जाहिराती मुंबईभर झळकल्या आणि मनामनात पोहोचल्या.
भाजपाने लाखो मतदारांवर दोन शब्द याच माध्यमातून बिंबवले आणि एक विश्वास निर्माण केला. एक म्हणजे, ‘परिवर्तन तर होणारच’ ही टॅगलाइन. मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता उलथविली जाऊ शकते हे त्यातून बिंबविले गेले. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक चेहरे होतेच. त्यातच, ‘हा माझा शब्द आहे’ अशी विकासाची आणि पारदर्शक कारभाराची हमी देणारी दुसरी टॅगलाइन मुख्यमंत्र्यांच्या छबीसह वापरून सर्वत्र जाहिराती करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री मनामनात पोहोचले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही भाजपाच्या यशात जाहिरातबाजीचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आक्रमक जाहिरात मोहिमेवर केलेला मोठा खर्च आणि त्यातून सगळीकडे भाजपाचा प्रभाव निर्माण करण्याचे तंत्र भाजपाने अवलंबिले, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत जाहिरातींचा विचार करता भाजपा अव्वल तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र हात आखडता घेतला. त्यांना पराजयाची पूर्वकल्पना होती की विजयाची आसच नव्हती, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. २०१२च्या निवडणुकीत प्रभावी जाहिरातबाजीचा प्रयत्न करणारे हे दोन्ही पक्ष या वेळी त्याबाबत ढेपाळले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Advertising, Use of Digital Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.