पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला

By admin | Published: May 25, 2017 11:06 PM2017-05-25T23:06:05+5:302017-05-25T23:06:05+5:30

पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला

The advice of a God-fearing woman to kill a stomach's daughter | पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला

पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘जन्माला आलेली मुलगी अपशकुनी आहे, तिला संपवून टाका तरच तुमची प्रगती होईल,’ असा अघोरी
सल्ला देणाऱ्या देवऋषी महिलेविरोधात उच्चशिक्षित विवाहितेने ‘अंनिस’कडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी देवॠषीला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे हा सल्ला मान्य करण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांमध्ये नवरा, दीर व पोलीस हवालदार चुलत सासऱ्याचाही समावेश असून, संबंधितांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी ‘अंनिस’ला दिले आहे. ‘अंनिस’ने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शीतल अमोल भाग्यवंत (वय २८, रा. वारुंजी, ता. कऱ्हाड) ही विवाहिता उच्चशिक्षित आहे. खटाव तालुक्यातील गोरेगाव येथील अमोल तानाजी भाग्यवंत यांच्याशी ३० मे २०१५ रोजी तिचा विवाह झाला. तिला एक वर्षाची मुलगीही आहे. लग्नादिवशीच्या रात्रीच दीर संतोष, नणंद अमिता यांच्या अंगात आले होते. ‘ही आपल्या घराची सून आहे. मात्र, तिच्या डोळ्यांतून पाणी आले नाही,’ असे अंगात आलेल्या देवाने सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी नाशिक येथील एका महाराजाकडे आशीर्वाद घेण्यासाठी आपण जाऊ, असा तगादा दीर, नणंद, जाऊ, चुलत सासरे धनाजी (पोलीस हवालदार) यांनी लावला. मात्र, शीतल या त्या ठिकाणी गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा छळ सुरू झाला.
पुसेसावळी (ता. खटाव) येथे राहणारी नवऱ्याची आत्या चंद्रभागा भाग्यवंत ही बुवाबाजी करते. तिच्याही अंगात येते. या कुटुंबातील जवळपास सगळ्यांच्याच अंगात येत असून, त्यांच्या अंगातील तथाकथित देवीने ‘ही मुलगी वागायला चांगली नाही. हिच्यामुळे आपल्या कुटुंबाचा नाश होणार आहे. तसेच यावर उपाय म्हणून हिच्या केसाची एक बट देवीला अर्पण कर,’ असे तिला सांगण्यात आले. मात्र, या सर्व गोष्टीला शीतलने ठाम नकार दिला. त्यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला.
शीतलला मुलगी झाल्यानंतर देवऋषी आत्याने ‘ही मुलगी अपशकुनी आहे. आपल्याला मुलगा हवा होता. या मुलीला संपवून टाका तरच तुमची प्रगती होईल,’ असा सल्ला दिला. त्यानंतर घाबरलेल्या संबंधित विवाहितेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दिली. तेव्हा संबंधित कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पोलीस खात्याने चंद्रभागाला ताब्यात घेतले.
या कारवाईत ‘अंनिस’चे प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, शंकर कणसे, प्रशांत जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्या पथकाने सहभाग घेतला.

पदाधिकारी तळ ठोकून
शीतलने तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी औंध पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळपासून तळ ठोकून होते. याप्रकरणी जादूटोणा विरोध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Web Title: The advice of a God-fearing woman to kill a stomach's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.