पंतप्रधान आवास योजनेसाठीही सल्लागार कंपनी
By admin | Published: July 13, 2017 12:59 AM2017-07-13T00:59:51+5:302017-07-13T00:59:51+5:30
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या विषयाला मान्यता दिली असून प्रकल्प खर्चाच्या १ टक्का रक्कम यासाठी कंपनीला दिली जाईल. या कामासाठी आलेल्या तीनपैकी एका निविदेला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. ही योजना विविध चार गटांमध्ये राबविण्यात येणार असून सर्व गटांचे मिळून ९३ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यासाठी महापालिका ठिकठिकाणी भूखंड शोधत आहे. दरम्यान यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी म्हणून सल्लागार कंपनी नियुक्त करणे गरजेचे आहे. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यांतील सर्वांत कमी म्हणजे १ टक्का शुल्क आकारणाऱ्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठीही सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र तो पुढे ढकलण्यात आला. शहरातील भटक्या श्वानांसाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा विषय होता. त्याला प्रत्येक श्वानामागे ६७५ रुपये याप्रमाणे मंजुरी देण्यात आली. अशी शस्त्रक्रिया केल्यानंतरही शहरातील श्वानांची संख्या वाढतच असल्याने त्यांच्यासाठी शहराच्या काही भागांमध्ये संगोपन केंद्र सुरू करण्याचा विचार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
महमंदवाडी (हडपसर) येथे वारकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिला होता. तो मंजूर करण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये तरतूद आहे. शहराच्या अन्य भागातही वारकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पुढील अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. काही सदस्यांनी वर्गीकरणाचे प्रस्ताव दिले होते; मात्र ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. कमला नेहरू रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
।वाहतूक शाखेसाठी देण्यात आलेल्या १४८ वॉडर्नचे तीन महिन्यांचे वेतन थकले होते. त्यासाठी १ कोटी रुपये वर्ग करून देण्यात आले आहेत. मात्र, आता ही व्यवस्था महापालिकेने करावी किंवा नाही, याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असे अध्यक्ष मोहोळ यांनी सांगितले.