महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा राजीनामा
By admin | Published: June 10, 2015 03:03 AM2015-06-10T03:03:37+5:302015-06-10T03:03:37+5:30
राज्याचे महाधिवक्ता अॅड. सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तो स्वीकारण्यात आला.
मुंबई : राज्याचे महाधिवक्ता अॅड. सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तो स्वीकारण्यात आला. या पदाचा अतिरिक्त कार्यभार सॉलिसिटर
जनरल अनिल सिंग यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे.
भाजपा सरकार आल्यानंतर अॅड. मनोहर यांची १८ नोव्हेंबर २०१४ रोजी महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यापूर्वी अॅड.दरियास खंबाटा हे या पदावर होते. अॅड. मनोहर यांचा गेल्या सात महिन्यांतील अनुभव अतिशय चांगला होता आणि शासनाला विधी सल्ला देण्याची चोख भूमिका त्यांनी पार पाडली, अशी भावना बहुतेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत व्यक्त केली. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून विधी पदवी संपादन केलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनोहर कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अॅड.व्ही.आर.मनोहर यांनी मुंबईत स्थलांतरित व्हावे म्हणजे अॅड.सुनील यांना महाधिवक्तापदाचा राजीनामा न देता वडिलांची सेवा करता येईल, असा प्रयत्नही मुख्यमंत्र्यांनी करून पाहिला होता. त्यासाठी त्यांनी अॅड.व्ही.आर.मनोहर यांची नागपुरातील निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. परंतु वार्धक्यामुळे मुंबईत स्थलांतरित होण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली होती.
का दिला राजीनामा ?
अॅड.सुनील मनोहर हे नागपूरचे प्रख्यात विधिज्ञ व्ही.आर.मनोहर यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या तब्येतीची काळजी घेता यावी आणि त्यांच्यासोबत नागपूरला राहता यावे, म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जाते. सुनील यांचे बंधू अॅड.शशांक हेही निष्णात वकील असून, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत.