Maharashtra Politics: “गृहमंत्रालयाने दखल घ्यावी, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’वर बंदी घालावी”; सदावर्तेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:24 PM2022-10-25T16:24:50+5:302022-10-25T16:25:30+5:30
Maharashtra News: राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत असून, गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घ्यावी, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर केलेला हल्ला यानंतर मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आलेले आणि लोकप्रिय झालेले ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी आता थेट सामना दैनिकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अलीकडेच गुणरत्न सदावर्ते आणि डॉ. जयश्री पाटील यांच्या हस्ते कष्टकरी जनसंघाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर अनेकदा सदावर्ते यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले.
रश्मी शुक्ला यांच्याबाबत दैनिक सामनातून सुरु असलेल्या वृत्तांकनाचे कारण पुढे करत गुणरत्न सदावर्ते यांनी सामना दैनिकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणाचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मी यासंदर्भात आरएनआय कार्यालयाकडे (रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया) आणि राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत आहे. राज्यातील गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
सामनावर बंदी कोणी आणू शकत नाही
दैनिक 'सामना'वर बंदीची कारवाई झाल्यास ठाकरे गटाला जबर धक्का बसू शकतो, असे सांगितले जात आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या सामना दैनिकावर बंदी घालण्याच्या मागणीवर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया करण्यात आले आहे. सामना दैनिकावर बंदी कोणी आणू शकत नाही. कारण त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागेल. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांची मागणी केवळ प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत सापडल्या होत्या. अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"