खंडपीठासाठी वकील रस्त्यावर !

By admin | Published: December 13, 2014 12:44 AM2014-12-13T00:44:45+5:302014-12-13T00:45:01+5:30

न्यायालयीन कामकाजावर परिणाम : महालोक अदालतवरही बहिष्कार

Advocate on the road to the bench! | खंडपीठासाठी वकील रस्त्यावर !

खंडपीठासाठी वकील रस्त्यावर !

Next

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील आज, शुक्रवारी काम बंद ठेवून रस्त्यावर उतरले. यामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले. कोल्हापुरातील टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाजवळ वकिलांनी दिवसभर लालफिती लावून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला शहरातील विविध पक्ष, संघटना व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून हे वकील उद्या, शनिवारी महालोक अदालतीवरही बहिष्कार घालणार आहेत. दरम्यान, जिल्हा पक्षकार महासंघानेही केंद्रीय महालोक अदालतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या २५ ते ३० वर्षांपासून लढा देत आहेत.
सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकिलांनी गेल्या वर्षी ५८ दिवस आंदोलन केल्यानंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याची शिफारस राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे केली होती.
न्यायमूर्ती शहा यांनी कोल्हापूर भेटीत जानेवारी २०१४ पर्यंत सर्किट बेंच
स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते स्थापन झालेले नाही. यामुळे सर्किट बेंचसाठी वकिलांनी आजपासून नव्याने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज काम बंद आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळी ज्येष्ठ वकील के. ए. कापसे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी अ‍ॅड. डी. बी. भोसले, अ‍ॅड. पी. आर. पाटील, अ‍ॅड. डी. डी. घाटगे, अ‍ॅड. माणिक मुळीक, अ‍ॅड. पी. आर. वाघवलीकर, अ‍ॅड. एस. बी. पाटील, अ‍ॅड. ए. डी. भूमकर, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, आदींनी आपल्या भाषणात कोणत्याही स्थितीत कोल्हापूरला खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करून त्यामागची कारणे विषद केली.
त्यानंतर दुपारी वकिलांनी कावळा नाका येथून शहरात खंडपीठ प्रश्नासाठी रॅली काढली. ही रॅली व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक व महापालिकामार्गे सीपीआर रुग्णालयाजवळ आली. सायंकाळीही हे आंदोलन सुरू होते. वकील आंदोलनात असल्यामुळे न्यायालयातील कामकाजावर परिणाम जाणवला. जोपर्यंत शासन खंडपीठाबाबत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत लाल फिती लावून काम करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे.
या आंदोलनाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, जिल्हा पक्षकार महासंघाचे निमंत्रक पद्माकर कापसे, प्रसाद जाधव, सुरेश गायकवाड यांच्यासह पक्षकारांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी संजय मंडलिक यांनी याप्रश्नी जिल्ह्यातील सहा आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत भेट घेऊ, असे आश्वासन दिले. आंदोलनात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, वकील यांनी भाग घेतला होता.


आजचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व न्यायालयांमधील सुमारे साडेतीन
हजार खटल्यांच्या सुनावणीचे कामकाज झाले नाही.
- अ‍ॅड. विवेक घाटगे,
निमंत्रक, खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.


गौडा यांच्याबरोबर मंगळवारी बैठक
कोल्हापूर खंडपीठप्रश्नी मंगळवारी (दि. १६ ) केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक व खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीला (दि. १४) रविवारी कोल्हापुरातून निमंत्रक व जिल्हा वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. सचिव राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, आदी जाणार आहेत.

Web Title: Advocate on the road to the bench!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.