शिवाजीनगर न्यायालयात वकिलांचा राडा
By admin | Published: August 27, 2016 01:26 AM2016-08-27T01:26:29+5:302016-08-27T01:26:29+5:30
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला.
पुणे : न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला. अटक बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले.
अॅड. आकाश मारणे यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. मारणे यांनी अटकपूर्व जामीनही मंजूर आहे. असे असताना पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांनी मारणेंच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत मारणेला हजर राहण्यास सांगत मारहाण केली होती. ते हजर झाल्याशिवाय वडिलांना सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.
जेव्हा मारणे गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. अॅड. दुशिंग यांनीही पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून मारणेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे सांगितले होते. पोलिसांना माहिती देऊनही मारणेंना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे शिवाजीनगर न्यायालयातील संतप्त झालेले वकील उपनिरीक्षक मोरे यांना मारहाण करण्याच्या मन:स्थितीत होते. परंतु, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. गिरीश शेडगे, अॅड. एन. डी. पाटील, अॅड. मिलिंद पवार आदी वरिष्ठ वकिलांनी स्वत: संरक्षण देत मोरे यांना न्यायालयात नेले.
मारणे यांनी अर्ज करून आपली अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास
आणून दिले. मारणे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्रावर १५० पेक्षा अधिक वकिलांनी सह्या केल्याचे अॅड. दुशिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने उपअधीक्षकांना नोटीस बजावली असून मारणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात
अर्ज करण्यात आला आहे.