निराधार वर्षाचे एडीओंनी केले कन्यादान
By admin | Published: January 20, 2016 02:20 AM2016-01-20T02:20:20+5:302016-01-20T02:20:20+5:30
अकोल्यातील अधिका-याचे असेही दातृत्व; लोकमतने टाकला होता प्रकाशझोत
शिर्ला (पातूर, अकोला): देऊळगाव येथील एका निराधार मुलीचे कन्यादान अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविवारी केले. एका अधिकार्याच्या या दातृत्वामुळे समाजासमोर नवा आदर्श निर्माण झाला आहे.
पातूर तालुक्यातील देऊळगाव हे गाव विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात सुरेश उपर्वट हे मजुरी करून चार मुलांसह परिवाराचा गाडा ओढत होते. या दाम्पत्याला अवघ्या चाळीशीत विविध आजारांनी गाठले. अशातच पत्नीचा २0१२ साली, तर पुढच्याच वर्षी पतीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर वर्षा, मनीषा, निखिल, सुशील ही चौघेही भावंडे निराधार झाली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने समाजातील भीमराव उपर्वट यांनी पुढाकार घेत त्यांना शक्य तेवढी मदत केली. पशू उपचारानिमित्त गावोगावी फिरणार्या श्रीकांत समाधान बोरकर यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. श्रीकांतच्या पाठपुराव्याने तहसीलदार राजेश वझिरे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनीही पुढाकार घेतला.
ह्यलोकमतह्णमधील वृत्त वाचून मी या मुलांकडे तहसीलदार राजेश वझिरे यांच्यासमवेत गेलो. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. समाजानेही समोर येऊन अशी जबाबदारी पार पाडावी. आज वर्षाचे कन्यादान करताना डोळय़ात आनंदाश्रू आले असल्याचे मनोगत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी - प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले.
उपर्वट कुटुंबातील मुलांच्या संघर्षगाथेवर नोव्हेंबर २0१४ मध्ये ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला होता. तहसीलदारांनी या मुलांना अंत्योदय योजनेसह विविध योजनांचा लाभही मिळवून दिला.
असा झाला आनंद सोहळा
वर्षाचा लग्नसोहळा अकोल्याच्या मनीषसोबत अकोल्यातील अशोक वाटिकेत रविवारी ११.३0 वाजता संपन्न झाला. वर्षाचे कन्यादान करण्यासाठी एसडीओ प्रा. संजय खडसे उपस्थित होते. त्यांनी लग्नासाठी आर्थिक मदतही दिली. पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, तलाठी चव्हाण आदींनीही या कार्यासाठी आर्थिक मदत दिली. यावेळी भीमराव उपर्वट, रामकृष्ण उपर्वट, बबलू तायडे, सुधाकर इंगळे, श्यामराव इंगळे, राजू सदार आदी उपस्थित होते.