नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा हवाई सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:31 AM2021-08-03T11:31:27+5:302021-08-03T11:32:09+5:30
देशातील सहा नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई हायस्पीड कॉरिडोर प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, डेटा विश्लेषणाचे काम सुरू आहे.
- आनंद शर्मा
नागपूर : देशातील सहा नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई हायस्पीड कॉरिडोर प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, डेटा विश्लेषणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी लवकरच इतर सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. त्यानंतर डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी रेल्वे लाइनचे फायनल अलायमेंट डिझाईन आणि प्रायमरी रुट मॅप तयार करण्यासाठी हवाई सर्वेक्षण (लिडार सर्व्हे) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये निविदा मागविण्यात आली होती. त्यात सिकॉन आणि हेलिका या ज्वाईंट व्हेंचर कंपनीला सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले. कंपनीने १२ मार्च २०२१ रोजी हे काम सुरू केले. त्यानुसार हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लिडार आणि इमेजनरी सेंसर लावून मुंबई ते नागपूरपर्यंतच्या मार्गावर सर्वेक्षण करण्यात आले. या कामासाठी १५० दिवसांचा वेळ देण्यात आला होता.