वायुसेना कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सज्ज
By admin | Published: September 21, 2016 08:02 PM2016-09-21T20:02:32+5:302016-09-21T20:02:32+5:30
भारतीय वायुसेना देशासमोरील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत वायुदलाचा पाठीचा कणा असणाऱ्या नाशिकच्या ओझर येथील ११ बीआरडी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २१ : भारतीय वायुसेना देशासमोरील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत वायुदलाचा पाठीचा कणा असणाऱ्या नाशिकच्या ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) मध्ये लढाऊ विमानांचे नूतनीकरण व दुरुस्ती, विमानांना अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्याचे काम अविरत सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्याची क्षमता या मदर डेपोमध्ये असल्याचे प्रतिपादन ११ बीआरडीचे स्टेशन कमांडर ग्रुप कॅ प्टन पी. के. आनंद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही संकटात अथवा आपत्कालीन स्थितीत प्रथम वायुदलाची कृती महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील उरी खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्र्श्वभूमीवर वायुसेनेच्या डेपोकडून मिळालेल्या या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे. वायुसेनेच्या ८४ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ओझरमिग येथील ११ बीआरडी स्टेशनच्या नालंदा सभागृहात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आनंद यांनी, वायुदलाने गेल्या ८३ वर्षांच्या कारकीर्दीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला.
ओझर येथील डेपोमध्ये मिग २९ आणि सुखोई ३० विमानांच्या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी नाशिकमधील १००हून अधिक उद्योगांचे ११ बीआरडीमध्ये सुरू असलेली दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे सुटे भाग प्राप्त होत असत त्यामुळे नाशिकच्या उद्योग क्षेत्राला एव्हियशनचे स्वरूप प्राप्त झाल्याचे मत आनंद यांनी व्यक्त केले. दरम्यान, वेगवेगळ्या वातावरणामुळेही मिग २१ सारख्या विमानांना अपघात होत असले तरी या विमानांना अद्ययावत करण्याचे काम भारतात होत असल्याचे ते म्हणाले.