पुरग्रस्त विद्यार्थ्यांना ‘कृषी’च्या तिसऱ्या फेरीत मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:12 PM2019-08-12T15:12:29+5:302019-08-12T15:16:03+5:30
दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल..
पुणे : अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेश फेरीत संधी दिली जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.
राज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमधील बीएससी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या यांसह आठ पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कृषी परिषदेमार्फत राबविली जात आहे. राज्यात एकुण ११ हजार ७३० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत आहे. तर तिसरी फेरी दि. १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी तसेच सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची टांगती तलवार आहे. पण परिषदेने या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी माहिती देताना कौसडीकर म्हणाले, महापुर तसेच अतिवृष्टीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी दुसºया फेरीची मुदत दि. १३ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. पण त्यानंतर या फेरीत निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता आलेला नाही. सांगली व कोल्हापुरमधील विद्यार्थी बाहेर जाऊ शकले नाहीत. तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी याभागात येऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी निवड होऊनही प्रवेश घेतले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसºया फेरीमध्ये संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश द्यायचा की प्रक्रियेनुसार प्रवेश द्यावा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी दि. १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पीएचडीची दि. १० ऑगस्ट रोजी होणारी प्रवेश परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे कौसडीकर यांनी सांगितले.
----------