उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून घेतली शपथपत्रे
By admin | Published: December 29, 2016 04:59 PM2016-12-29T16:59:02+5:302016-12-29T16:59:02+5:30
वाशिम जिल्हा परिषद स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.
ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन ( वाशिम ), दि. 29 - वाशिम जिल्हा परिषद स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. यासाठी विविध उपक्रमही ते राबवित आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईसुद्धा करीत आहे. आता एक नवाच प्रयोग त्यांनी केला असून, मालेगाव तालुक्यातील विविध गावांत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून पुन्हा अशी चूक न करण्याचे शपथपत्रच गुड मॉर्निंग पथक लिहून घेत आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडून गावागावात स्वच्छता अभियानाबाबत वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेला शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी मालेगाव तालुक्यात गुरुवारी सकाळी विविध गावांत भेटी दिल्या.
यावेळी उघड्यावर शौचास जाताना आढळलेल्या लोकांना त्यांनी समज दिली. यावेळी शिरपूर जैनसह शेलगाव बगाडे, शेलगाव खवणे येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून पुन्हा ही चूक होणार नाही, अशा आशयाचे शपथपत्रच त्यांनी लिहून घेतले आणि त्यानंतरही उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास मुंंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११५ मधील क, ख, ग व कलम ११७ नुसार दंडाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. यावेळी गुड मॉर्निंग पथकासोबत ग्रामसेवक संजय बेदरे, गजानन दहात्रे, अमोल राजे, भगवान सोमटकर, भागवत भुरकाडे, निवास पांडे, वाहनचालक अफसरभाई हे उपस्थित होते.