बारावीनंतर थेट नर्सिंगला मिळणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:14 AM2017-10-17T05:14:11+5:302017-10-17T05:14:25+5:30
राज्यातील आरोग्य सेवेवर गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त भार पडत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाही.
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवेवर गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त भार पडत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाही. त्यातच नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट’च्या नियमामुळे नर्सिंगच्या जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे आता विज्ञान शाखेतील पदवीच्या प्रथम वर्षासाठी नर्सिंगचा पर्याय निवडणाºया विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ची अट काढून टाकण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाने सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर थेट नर्सिंगला प्रवेश घेता येणार आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित, पालिका आणि खासगी विनाअनुदानित अखत्यारीतील सर्व विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ‘परीक्षेचा नियम लागू करण्यात आला होता. त्यामुळे नर्सिंगच्या अनेक जागा रिक्त राहत होत्या. तसेच विद्यार्थ्यांचेही नुकसान झाल्याचे चित्र होते.
बारावीचे गुण ग्राह्य
राज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका आणि खासगी विनाअनुदानित अखत्यारीत येणाºया सर्व विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ बंधनकारकहोते. मात्र परिणामांचा विचार करून आता नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातील.