१५ तासानंतर ते पडले पुरातून बाहेर
By admin | Published: September 13, 2016 05:57 AM2016-09-13T05:57:04+5:302016-09-13T05:57:04+5:30
रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली.
भामरागड (गडचिरोली) : रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. मात्र पर्लकोटाच्या पुलावर पाणी असताना एक ते दोन फूट पाण्यातून शेकडो महिला व नागरिकांनी आपल्या घराची वाट धरली.
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विविध समस्यांनी सतत त्रस्त असलेल्या भामरागडला यंदा पावसाने बेजार करून टाकले आहे. पर्लकोटाच्या पुरामुळे रविवारी दिवसभर भामरागडचा संपर्क तुटलेला होता. सायंकाळी ५ वाजता दळणवळण सुरू झाले तोच पुन्हा रात्री पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढल्याने सोमवारी दिवसभर भामरागडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारी ३.५४ वाजता पुलावर एक फूट पाणी असताना १५ तासापासून अडकून पडलेल्या शेकडो महिला व नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाट काढत आपले गाव व घर जवळ केले. परस्परांना पकडून साखळी करत पुरातून या महिला चालत गेल्या. भामरागडचा या पावसाळ्यात किमान आठ ते दहा वेळा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ३० वाहने भामरागडात अडकली. त्यातील प्रवाशीही पुलावरील पाण्यातून चालत गेले. (प्रतिनिधी)
पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़ त्यामुळे विदर्भ आणि तेलंगणा येथेही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़
विसर्जनादिवशी पाऊस
मराठवाडा व विदर्भात १३ ते १५ सप्टेंबर, कोकणात १५ व १६ सप्टेंबर आणि मध्य महाराष्ट्रात १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे़ त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.