कुमारीमाता २१ वर्षांनंतरही वाऱ्यावरच, शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:07 AM2019-02-17T07:07:53+5:302019-02-17T07:09:16+5:30
एनजीओंचा विकास, पीडित तशाच । शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी
अविनाश साबापुरे
यवतमाळ : फुलपाखराचे मन आणि रानफुलांचे वन लाभलेल्या शेकडो अजाण मुलींना संधीसाधूंनी क्षणिक मोहासाठी लुटले. आणि पोटुशी झाल्यावर वाºयावर सोडले. पोरवयातच लेकूरवाळ्या झालेल्या या अभागी मुलींना समाज ‘कुमारी माता’ हे उदात्त बिरुद चिटकवून मोकळा झाला. पण शासन आणि महिला आयोग केवळ पाहणी, आढावा आणि सर्वेक्षण करून थांबले आहेत.
झरी जामणी तालुक्यातील (जि. यवतमाळ) हा प्रश्न गेल्या २१ वर्षांपासून चरचरत आहे. ठेकेदार, तेलंगणातून येणारे ट्रक चालक, सावकार व गुंड-पुंडांनी अल्पवयीन मुलींना भोगले. कुडा-मातीच्या टीचभर झोपडीत राहणाºया या मुलींना जंगल नवे नाही. इतरांना मदत करणे, सर्वांशी प्रामाणिक राहणे हा या समाजाचा मूळ स्वभाव आहे. तोच हेरून अगदी दहा रुपयांचे आमिष दाखवून मुलींच्या अब्रूचा खेळ केला. तर शिक्षणाचा अभाव असल्याने, पीडित मुलींनाही अनेक दिवस आपण बळी ठरल्याची जाणच नव्हती. घरातल्या मंडळींनीही सुरवातीला आरडाओरड करून नंतर ‘हे असे गरिबांसोबत घडतच असते’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतली.
गेल्या २५-३० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पण १९९७ पासून प्रसिद्धी माध्यमांनी ‘कुमारी मातां’चा हा प्रश्न जगापुढे आणला. त्यानंतर मुंबई-पुण्याच्या नेत्यांपासून तर महिला आयोगाच्या पदाधिकाºयांनी दौरे केले. सरकारने आकडेवारी गोळा केली. महिला आयोगानेही सर्वेक्षण केले. शासन आजही येथे ४८ कुमारी माता असल्याचे सांगते, पण गावकºयांच्या मते हा आकडा शंभराहून अधिक आहे.
कोणीबी याचं, नाव लिवाचं... द्याचं काईच नाई
शासनाचे प्रतिनिधी, अधिकारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि जातात. आपल्यासाठी काहीच करीत नाही, या भावनेतून झरीवासी प्रतिसादही द्यायला तयार नाही. ‘कोणीबी याचं नाव लिवाचं. द्याचं काईच नाई. कोणी मन्ते पोराले धरून फोटो काढ. कोणी मन्ते घरासंग उभी राहून फोटो काढू दे...’ अशा शब्दात एका कुमारी मातेने आपला संताप सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केला.
‘त्या’ कोवळ्या जीवांचे काय?
कुमारीमातांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांचा गंभीर प्रश्न आहे. अल्पवयात प्रसुत झालेल्या या मातांना बाळांची काळजी कशी घ्यावी, हेही निट ठाऊक नसते. ज्यांची मुले कशीबशी मोठी झाली, त्यांच्या शिक्षणाचा मोठा पेच आहे. शाळेत नाव टाकायचे तर बापाचे नाव हवे असते, जातीचा दाखला हवा असतो. काही जणींनी आजोबाचे (स्वत:च्याच वडिलाचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. तर काही जणींनी बापाच्या ऐवजी स्वत:चेच (आईचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. पण शाळेत गेल्यावरही ‘तुझा बाप कोण’ हा प्रश्न या मुलांना जगणे नकोसे करतोच.