पीडितेचा अखेर २४ आठवड्यांनंतर गर्भपात
By admin | Published: July 28, 2016 01:36 AM2016-07-28T01:36:28+5:302016-07-28T01:36:28+5:30
अर्भक ‘अॅबनॉर्मल’ असल्यामुळे गर्भधारणा होऊन २४ आठवडे होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर
मुंबई : अर्भक ‘अॅबनॉर्मल’ असल्यामुळे गर्भधारणा होऊन २४ आठवडे होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कूपर रुग्णालयात मंगळवारी गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी नैसर्गिकरीत्या पीडितेचा गर्भपात झाला आहे.
प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने गर्भधारणा झालेल्या मुंबईतील पीडितेला गर्भपात करायचा होता. कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्याची मुदत आहे. या पीडितेला गर्भधारणा होऊन २० आठवडे उलटल्यामुळे मुंबईतील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला होता. अर्भक ‘अॅबनॉर्मल’ असल्याचे तपासणीमध्ये कळल्यानंतर गर्भपाताच्या परवानगीसाठी पीडितेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वाेच्च न्यायालयाने पीडितेची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात या पीडितेची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती. हा तपासणी अहवाल सोमवार, २५ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यानंतर गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली.
पीडितेला सोमवारी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती स्थिर असल्यामुळे मंगळवारी गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बुधवारी सकाळी नैसर्गिकरीत्या पीडितेचा गर्भपात झाला. तिला पुढचे दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. रीमा वाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गर्भपाताचा अहवाल महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे आणि राज्य सरकारकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)