२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो
By गणेश वासनिक | Published: April 1, 2024 10:53 PM2024-04-01T22:53:13+5:302024-04-01T22:54:00+5:30
महायुती अन् महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारात होतेयं वापर
अमरावती : राज्यात १९९५ मध्ये युती उद्यास आली तेव्हापासून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप असो वा शिवसेना या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या पोस्टर, फ्लेक्स, बॅनर, पॉम्प्लेट आदींवर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असायचे. मात्र, यंदा पहिल्यांदाच तब्बल २५ वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवारांच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले जात आहे.
१९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकारदेखील स्थापन झाले होते. युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्री म्हणून गाेपीनाथ मुंडे यांची नोंद राज्याच्या राजकारणात झाली आहे. मात्र बदलते राजकीय समिकरण, वर्चस्ववाद, मतभेद आणि मनभेदामुळे २०१९ मध्ये भाजप-सेना युती दुभंगली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन तीन पक्षाच्या सरकारचा गाडा हाकला. परंतु, कोराेना ओसरताच शिवसेनेतील आमदारांनी निधी मिळत नाही. राष्ट्रवादीचे नेते अपमानास्पद वागणूक देतात. काँग्रेस, राष्ट्रवादीतून बाहेर पडा, असा सूर आवळला. नेमकी हिच खदखद भाजपने ‘कॅश’ केली.
एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे ४४ आमदार आणि १३ खासदारांनी उद्वव ठाकरे यांना ‘रामराम’ करीत वेगळी चुल मांडली. भाजपच्या आगळ्यावेगळ्या खेळीने सेना-भाजप युतीचे पुन्हा २०२२ मध्ये सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार चालविण्यास प्रारंभ केला. यात भरीसभर अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली. तब्बल ४३ आमदार, सहा खासदार सोबत घेत अजित पवारांनी भाजप-सेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कारभार हाकत आहेत. भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षाचे सरकार हल्ली राज्यात अस्तित्वात आहे.
शिंदेकडे शिवसेना तर अजित पवारांकडे राष्ट्रवादीची धुरा
राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष, चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा असल्याचा निर्वाळा दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्वव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय भविष्याची परीक्षा घेणारा ठरला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्वव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाले आहे.
उमेदवार कोणीही पण बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र कायम
महायुती अन् महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात फ्लेक्स, बॅनर, पॉम्प्लेट आदी प्रचार साहित्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आवर्जुन दिसणार आहे. शिवसेना उद्वव ठाकरे गट अथवा शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांसह चांद्यापासून तर बांध्यापर्यंत महायुती अन् महाविकास आघाडीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असणार आहे. एकंदरीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचारात २५ वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रांचा वापर करणार आहे, हे विशेष.