२८ तासांनंतर तारापूरचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू
By Admin | Published: May 21, 2016 04:02 AM2016-05-21T04:02:49+5:302016-05-21T04:02:49+5:30
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला.
बोईसर : तारापूर एमआयडीसीसह परिसरातील २० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या ३६ इंच व्यासाच्या लोखंडी पत्र्याच्या जलवाहिनीवर गुरुवारी सकाळी कंटेनरवरील अवजड कॉइल वाघोळ खिंडीत कोसळून फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला.
कंटेनरवरून सुमारे २० टनांची पत्र्याची कॉइल २० फूट खाली पाइपलाइनवर कोसळल्याने पाइप दोन ते तीन ठिकाणी फुटला होता. या दुरुस्ती कामाकरिता तीन क्रेन, एक जनरेटर सेट, चार वेल्डिंग मशीन, १२ वेल्डर्स, काही फिटर्स तसेच एमआयडीसीचे अभियंते व अधिकारी आणि मदतनीस अशा सुमारे ४० जणांच्या टीमने गुरुवारी साडेअकरा वाजता सुरू केले, ते आज सकाळी साडेनऊ वाजता संपले.
अवजड कॉइलमुळे फाटलेला पाइप पूर्ण कापून काढून त्या जागी आठ एमएम जाडीचा व १२ मीटर लांब आणि १००० एमएम व्यासाचा पाइप नव्याने टाकण्यात आला. उन्हाचा पारा वाढल्याने वेल्डर्सना चक्कर आली होती. मात्र, एमआयडीसीमधील काही कारखान्यांतून वेल्डर्स मागवून काम पूर्ण करण्यात आले. वाघोबा खिंडीच्या उतार भागात हे काम सुरू असताना अहोरात्र भरधाव धावणाऱ्या वाहनांपासूनही काम करणाऱ्यांना धोका उद्भवत होता. य ासर्वांवर मात करून ठप्प झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास एमआयडीसीचे अभियंता नंदकुमार करवा आणि आर.पी. पाटील व त्यांच्या टीमला यश आले. (वार्ताहर)
युद्धपातळीवर काम केल्याने दोन ते अडीच दिवसांचे काम २५ तासांत पूर्ण केले असून या अपघातामुळे एमआयडीसीचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई एमआयडीसी सदर ट्रान्सपोर्टवाल्यांकडून वसूल करणार आहे.
- नंदकुमार करावा,
उपअभियंता, एमआयडीसी तारापूर.