३ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले : पुन्हा जंगलात रवानगी
By admin | Published: December 24, 2016 02:36 PM2016-12-24T14:36:01+5:302016-12-24T22:16:09+5:30
कोंढव्यातील एमआयबीएम इन्स्टिट्युटमध्ये शनिवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे/कोंढवा, दि. 24 - कोंढव्यातील एनआयबीएम इन्स्टिट्यूटमध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट) बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती़ वनविभाग आणि कात्रज प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू टीमला तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात यश आले. तपासणीनंतर आता सायंकाळी त्याला दोन वाहनांतून जंगलात नेऊन सोडून देण्यात आले़
एनआयबीएममध्ये शिरलेला बिबट्या सुमारे ३ वर्षांचा पूर्ण वाढ झालेला असावा़ यापूर्वी केसनंद परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे़ तेथून हे अंतर साधारण १० किलोमीटर असून तेथून तो महंमदवाडीमार्गे भक्ष्याच्या शोधात चुकून आला असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़ एनआयबीएमच्या परिसरातही झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर आहेत.
संस्थेत एका बाजूला चहापाणी करण्यासाठी एक छोटी रूम आहे़ त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास सफाई कामगार स्वाती कुंजीर आल्या होत्या़ त्यांनी वॉशबेसिन सुरू करताच त्याच्या खाली बसलेला हा बिबट्या बाहेर पडला व तेथून समोरच असलेल्या कॉम्प्युटर रूममध्ये त्याने धूम ठोकली़ बिबट्याला पाहून कुंजीर या ओरडतच बाहेर आल्या़ त्यांनी ही बाब सुरक्षारक्षकांना सांगितली़ त्यांनी कॉम्प्युटर रूमचे दार बाहेरून बंद करून संचालकांना कळविले़ त्यांनी येऊन पाहणी केल्यावर वनविभागाला कळविले. पावणेनऊच्या सुमारास कात्रज प्राणिसंग्रहालयातील नीलमकुमार खैरे यांना ही माहिती मिळाली़ त्यांनी तातडीने रेस्क्यू टीमला एकत्र करून घटनास्थळी धाव घेतली़ तोपर्यंत वनविभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, वनक्षेत्रपाल गायकवाड, मोहन ढेरे व कर्मचारी तेथे पोहोचले होते़
बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच लोकांची एनआयबीएमच्या गेटवर एकच गर्दी झाली होती़ सुरक्षारक्षकांनी मात्र वेळीच काळजी घेऊन कोणालाही आत सोडले नाही़
रेस्क्यू टीममधील डॉ़ अंकुश दुबे, हरिष घाडगे, महेश देशपांडे, अनिल खैरे, उमेश परदेशी, केविन डिकोस्टा, रुबेन मालेकर, ज्ञानेश्वर हिरवे, राजेंद्र परदेशी यांनी कॉम्प्युटर रूमची पाहणी केली़ दरवाजाच्या वरील व्हेंटिलेटरमधून आता डोकावून पाहिल्यावर पहिल्या रूममध्ये बिबट्या दिसून आला नाही़ कॉम्प्युटर रूमच्या दोन खोल्यांमध्ये केवळ एक काच होती़ पहिल्या रूममध्ये बिबट्या नसल्याची खात्री पटल्यावर दरवाजा उघडून आत प्रवेश केला़ बिबट्या बाहेरच्या खोलीत येऊ नये, म्हणून या काचेच्या दरवाजाला कपाट लावले़ त्या ठिकाणी चौघे जण थांबले़ त्यानंतर दुसºया खोलीतील खिडकीच्या काचेला भुलीच्या इंजेक्शनची नळी जाईल इतके भोक पाडण्यात आले़
सुरुवातीला या रेस्क्यू टीमला बिबट्याचे हे पिलू असल्याचे सांगण्यात आले होते़ त्यानुसार डॉ. दुबे यांनी इंजेक्शनचा डोस तयार केला़ नळी काचेच्या खिडकीतून आत घालताना झालेल्या आवाजाने बिबट्या टेबलाखालून बाहेर आला. त्याला पाहिल्यावर तो पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे डॉ.दुबे यांच्या लक्षात आले़ त्यांनी त्यादृष्टीने दुसरा डोस तयार केला आणि काचेतून नळी आत घातली़ बिबट्या अवघ्या २ फुटांवर आल्यावर त्यांनी डॉट मारला़ तो बरोबर बिबट्याला लागला़ डॉट मारताच बिबट्याला भूल चढू लागली़ २० मिनिटांतच बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाला़
बिबट्या बेशुद्ध झाल्याचे दिसल्यावर रेस्क्यू टीमने नेटमध्ये त्याला घेऊन बाहेर आणले़ बाहेर असलेल्या पिंजºयात ठेवताना त्याला शुद्धीवर येण्यासाठी आवश्यक असे दुसरे इंजेक्शन देण्यात आले़ हा पिंजरा गाडीवर चढवून तो कात्रज प्राणिसंग्रहालयाकडे रवाना करण्यात आला़ सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत दुपारी १२ वाजता बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले़ त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कोठे दुखापत झाली आहे का, याची कात्रज प्राणिसंग्रहालयात आणून पाहणी केली़ हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला नर आहे. कोणत्याही प्रकारची दुखापत नसल्याने त्याला पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी दोन गाड्यांमधून त्याला घेऊन जंगलात नेऊन सोडून देण्यात आले़
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या ऊसशेतीमध्ये अनेक बिबट्यांचे वास्तव्य असते़ ऊसतोडणी झाल्याने त्यांचे निवासस्थान नष्ट होते. त्यामुळे हे बिबटे इतरत्र निवारा शोधत असतात़ त्यातून भक्ष्याच्या मागे वाट चुकून नागरीवस्तीत शिरताना दिसून येतात़ कुत्रा त्यांचे सहज आणि सोपे खाद्य आहे़ अशाच एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करीत हा बिबट्या नागरीवस्तीत आला असावा व लोकांचा आवाज ऐकून झाडी वेढलेल्या एनआयबीएममध्ये लपून बसला असावा, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला.
याबाबत डॉ़ नीलमकुमार खैरे यांनी सांगितले, की केसनंद परिसरात यापूर्वी बिबट्याने अनेकदा दर्शन दिले आहे़ त्या परिसरातून एनआयबीएमचे हवाई अंतर साधारण १० किमी आहे़ बिबटे एका दिवसात याच्यापेक्षा अधिक अंतर कापतात.
हा बिबट्या साधारण साडेतीन वर्षांचा असावा़ पूर्ण वाढ झालेला नर असून त्याचे साधारण ७० किलो वजन होते. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या़ कोणत्याही उपचाराची आवश्यकता नसल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात नेऊन सोडून देण्यात आल्याचे उपवनसरंक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले.