५९ दिवसांच्या पायी वारीनंतर पालखी सोहळ्याची सांगता!
By admin | Published: August 10, 2016 12:39 AM2016-08-10T00:39:57+5:302016-08-10T00:39:57+5:30
माहेरी भक्तीभावात भव्य स्वागत: मंदिरातील रिंगण सोहळा नेत्रांचे पारणे फेडणारा!
गजानन कलोरे
शेगाव (जि.बुलडाणा), दि. ९: पंढरपूर येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ९ ऑगस्ट रोजी येथे आगमन झाले. श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यावेळी निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील, शरद शिंदे, तहसीलदार गणेश पवार, मुख्याधिकारी अतुल पंत, एसडीओ प्रभाकर बेंडे, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, विश्वेश्वर त्रिकाळ, शेगाव अर्बनचे अध्यक्ष अरुण चांडक, राजेंद्र शेगोकार, माजी आ. विजयराज शिंदे, प्रकाश देशमुख, कमलाकर काठोळे, राजेंद्र शेगोकार आदी उपस्थित होते.
श्रींची पालखी महाविद्यालय परिसरात पोहचल्यानंतर वारकर्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर निळकंठदादा पाटील यांनी श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन केले. शेगाव शहराच्या मुख्य मार्गाने पालखी मिरवणुकीला दु. २ वा. सुरुवात करण्यात आली. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी मुख्य मार्गावर ठिक़ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी मंदिरात पोहचली.यावेळी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थित श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन व महाआरती विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी वारीत सहभागी टाळकर्यांचा रिंगन सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी शेगावसह बाहेरगावच्या भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
खामगावात स्वागत
संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. यावेळी लाखो भाविकांनी श्रीेंचे दर्शन घेतले. संत गजानन महाराजांच्या पालखीने ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेवून ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी सोमवारी सकाळी खामगावात पोहोचली. मंगळवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. भाविकांनी यावेळी खामगाव ते शेगाव माउलींसोबत पायी वारी केली.
पालखी सोहळ्यात स्वतंत्र विदर्भाचा गजर!
स्वतंत्र विदर्भाचे महत्व पटवून देण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ माझा पक्षाकडून मंगळवारी श्रींच्या पालखी सोहळ्यात वेगळ्या विदर्भाचा गजर करण्यात आला.
देशातील सत्तेचे राजकारण करणार्या काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता या पक्षांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर हा नवीन पक्ष वैदर्भिय जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल असा प्रयत्न आम्ही करू ही ग्वाही देत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे यासाठी मंगळवारी विदर्भ माझा पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे आणि विदर्भ सरचिटणीस मंगेश तेलंग यांनी खामगाव येथून शेगावकडे येणार्या भक्तांना वेगळ्या विदर्भाच्या टोप्या घातल्या. सायंकाळपर्यंत तीन हजार टोप्यांचे वितरण यावेळी करण्यात आले. त्यानंतर शहरातील ऑटो आणि चौकाचौकात स्टीकर चिटकविण्यात आले.