६ वर्षानंतर त्या चार नराधमांना जन्मठेपेची शिक्षा

By Admin | Published: August 22, 2016 07:07 PM2016-08-22T19:07:14+5:302016-08-22T20:36:03+5:30

२०१० साली नगर रस्त्यावर लष्करी महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मोक्का कोर्टाने चारीही अरोपींना जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे.

After 6 years, life imprisonment for those four Naradhams | ६ वर्षानंतर त्या चार नराधमांना जन्मठेपेची शिक्षा

६ वर्षानंतर त्या चार नराधमांना जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद : सैन्यदलात उच्च पदावर कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय महिला अधिकाऱ्याचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार आणि लुटमार करणाऱ्या चार दरोडेखोरांना मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या म्होरक्यावर गंभीर स्वरूपाचे विविध १७ गुन्हे दाखल आहेत.

पुणे येथे लष्करात उच्च पदावर कार्यरत असलेली महिला, तिचा पती, १६ वर्षीय मुलगा, त्यांचा वॉचमन, त्याची पत्नी यांच्यासोबत परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी १० एप्रिल २०१० रोजी खाजगी वाहनाने गेले होते. देवदर्शन करून ११ एप्रिल रोजी ते परत निघाले.

रात्री जेवण करण्यासाठी ते मांजरसुंबा घाटातील ढाब्यावर थांबले. त्या ठिकाणी ते जेवण करत असताना दुसऱ्या टेबलवर दीपक जावळे हा अट्टल गुन्हेगार आपल्या मित्रांसह जेवण करीत होता. त्याची नजर त्या कुटुंबावर पडली आणि त्याची नियत फिरली. जेवण आटोपल्यावर दीपकने एक कार भाड्याने घेतली. दरम्यान जेवण आटोपल्यानंतर महिला अधिकारी व त्यांचे कुटुंब कारने पुण्याच्या दिशेने निघाले. दीपक जावळे (२२), अभय पोरे (२३) , विजय बडे (२५) आणि सुनील एखंडे (२४) (सर्व रा. नगर जिल्हा) या दरोडेखोरांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. चिंचोडी फाट्याजवळ कार अडविली. 

दरोडेखोरांनी खाली उतरून कारमधील महिला अधिकाऱ्याचे पती, वॉचमन आणि मुलास खाली उतरविले. तर कारमध्ये असलेल्या महिला अधिकारी आणि वॉचमनच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. त्यांच्याजवळील रोख रक्कम, एटीएम कार्ड हिसकावून घेत महिला अधिकाऱ्याला कारमध्ये ओढून नेले. धावत्या कारमध्ये दीपक जावळे आणि अभय पोरे या दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर महिलेस विवस्त्र अवस्थेत धावत्या कारमधून ढकलून दिले.
दुचाकीस्वाराने महिलेची अब्रू झाकली

विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर उभ्या महिलेला पाहून मध्यरात्री दुचाकीवरून जाणाऱ्याने चौकशी केली असता तिने आपबीती सांगण्याच्या अगोदरच त्या तरुणांनी अंगातले शर्ट काढून महिलेस दिले. त्या महिलेची हकीकत ऐकल्यानंतर त्या तरुणांनी महिलेस तिच्या पतीकडे चिंचोडी फाट्याजवळ आणून सोडले. त्यानंतर महिलेच्या पतीने मोबाईलवर पुण्यातील पुतण्याला माहिती दिली. त्यांनी तातडीने १०० क्रमांकास कळविले. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पोलीस ठाण्यात नेले. घटना बीड जिल्ह्यात घडल्यामुळे अंभोरा पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर-बीड पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून दुसऱ्याच दिवशी दरोडेखोरांना ताब्यात घेतले. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपास केला. ही संघटित गुन्हेगारी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात रंजन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. दरोडेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संभाजी कदम यांनी तपास केला. तपास केल्यानंतर त्यांनी दोषारोपपत्र तयार करून अतिरिक्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांच्याकडे सादर केले. त्यांनी मान्यता दिल्यावर ते न्यायालयात दाखल केले.

बलात्कार, अपहरण गुन्ह्यात ठरविले दोषी
मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली असता मोक्काच्या विशेष वकील नीलिमा वर्तक यांनी ३४ साक्षीदार तपासले. न्यायालयाने दीपक आणि अभय यांना सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून प्रत्येकी जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी. लुटमार प्रकरणी चौघांनाही जन्मठेप, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, अपहरण केल्याच्या आरोपाखाली चौघांना ५ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी एक हजार रुपये दंड, न भरल्यास ६ महिने कैद. मोक्का कलम ३,१ प्रमाणे ७ वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड. मोक्का कलम ३ व २ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

Web Title: After 6 years, life imprisonment for those four Naradhams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.