दीर्घ प्रतीक्षेनंतर धो धो बरसला! मराठवाड्याला झोडपले; ५ जण गेले वाहून; महाराष्ट्रासह १८ राज्यांना आज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:34 AM2024-09-02T06:34:27+5:302024-09-02T06:35:34+5:30
Heavy Rain in Vidarbha & Marathwada: विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला.
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने दुर्घटनाही घडल्या आहेत.
विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी ते शेंबाळपिंपरी (जि. हिंगोली) रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे.
आज मुसळधारेचा इशारा
पुढील चार ते पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड : ६३ पैकी २६ मंडळात अतिवृष्टी. परभणी : २५ गावांचा संपर्क तुटला.
यवतमाळ : १३ तालुक्यांना पावसाने झोडपले.
वाशिम : मानोरा तालुक्यात बैलांसह छकडे वाहून गेले.
वर्धा : चाणकी (कोरडे) येथे आजोबा आणि नात नाल्यात वाहून गेले.
लातूर : ढोरसांगवी (ता. जळकोट) येथे ओढ्याच्या पुरात २० वर्षीय तरुण वाहून गेला.
यवतमाळ : देऊरवाडी लाड (ता. दारव्हा) येथे बैलगाडीसह शेतकरी वाहून गेला.
हिंगोली : टेंभुर्णी (ता. वसमत) येथे वाहून गेलेले शेतकरी सुभाष सवंडकर यांचा मृतदेह आढळला.
आंध्र-तेलंगणात मुसळधार, विविध दुर्घटनांत १० ठार
हैदराबाद / नवी दिल्ली: देशात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसामुळे जनजीवन स्कळीत झाले. आंध्र प्रदेशात दरडी कोसळून ५ जण ठार झाले तर इतर घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने दक्षिणेतील राज्यांना आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तेलंगणात केसमुद्रम व महबूबाबाददरम्यान रेल्वे रूळ वाहून गेले. सोमवारी शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली आहे.
■ उत्तराखंड, हिमाचलसह ५ राज्यांत पावसामुळे नद्यांना पूर तसेच भूस्खलनाचा इशारा.