महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला मुहुर्त, या तारखेला होणार शपथविधी, दीपक केसरकर यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:26 PM2022-08-03T18:26:10+5:302022-08-03T18:37:52+5:30
Eknatth Shinde Cabinet Expansion: ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शिंदे सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडत आहे.
मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जून महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. तर शिवसेनेत बंड करून ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शिंदे सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडत आहे. दरम्यान, अनेकवेळा तारीख पे तारीख झाल्यानंतर आता अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या रविवारपर्यंत अर्थात ७ ऑगस्टपर्यंत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडलाचा विस्तार होईल, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता वारंवार पुढे ढकलल्या जात असलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना यांच्याता सुरू असलेली न्यायालयीन लढाई सुप्रिम कोर्टात सुरू आहे. त्यामध्ये आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार वाद-प्रतिवाद झाले. त्यानंतर पुढील सुनावणीसाठी कोर्टाकडून उद्याचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.