जाहिरातीचा वाद: युती टिकण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय; शंभूराज देसाईंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:28 PM2023-06-14T15:28:32+5:302023-06-14T15:32:19+5:30
BJP-Shiv Sena Shinde Group: कोणताही बेबनाव नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती भक्कम आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
BJP-Shiv Sena Shinde Group: ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. लगेच दुसऱ्या दिवशी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचा समावेश असलेली नवी जाहिरात देण्यात आली. मात्र, या प्रकारावरून भाजप-शिंदे गटात नाराजी नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी याबाबत सारवासारव करायला सुरूवात केली असताना भाजप नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यानंतर आता याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली.
विषय संपवू आणि २०२४ च्या कामाला लागू. सामंज्यासाच्या भूमिकेतून पुढे जाऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते या समितीत असतील. जेव्हा समिती गठीत होईल, तेव्हा या सगळ्या बाबी समितीपुढे येतील, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. तसेच नवी जाहिरात ही शिवसेना पक्षाची अधिकृत जाहिरात आहे. भाजप आणि शिवसेना तसेच मित्र पक्षात काही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ते दूर व्हावे, यासाठी नवीन जाहिरात दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही युती भक्कम आहे. या महायुतीमध्ये कोणताही बेबनाव होणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी
जाहिरातीवरून भाजप नेते नाराज झाले असून, शिवसेना शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही. शिंदेंचा सर्व्हे ठाण्यापुरता मर्यादित होता का? एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटतो, अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली. यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. बेताल वक्तव्य कुणी करत असेल तर बरोबर नाही. आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्त्यांचे मन दुखावले. शिंदे-फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जाहिरात छापली का? भविष्यात असे होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. शिवसेनेच्या जाहिरातीचा विषय आता संपला. सरकारची प्रतिमा कोण खराब करू पाहत आहे, त्याला शोधले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.