दुपारनंतर मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 01:22 PM2017-09-08T13:22:37+5:302017-09-08T13:23:55+5:30
खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
पुणे, दि. 8 - खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता आहे. दुपारी मुंबईहून पुण्याला जाणा-या रेल्वे गाडया वेळेत निघणार असल्याची माहिती आहे. या अपघाताचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धातास उशिराने सुरु आहे.
ऐन कार्यालयीन वेळेत हा खोळंबा झाल्याने कर्मचारी कार्यालयात जाण्यास विलंब झाला. दरम्यान आजही मुंबई-पुणे मार्गावरील काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर, काहींचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
पुणे - निजामुद्दीन 12263 एक्सप्रेस ही गाडी आज सकाळी तिच्या निर्धारित वेळ 11.10 मिनिटाऐवजी सायंकाळी 18. 15 वाजता पुण्याहून सुटणार आहे. पुण्याहून दुपारी मुंबईला जाणारी डेक्कन एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे कर्जत पेसेंजर ही रद्द करण्यात आली आहे.
मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटवण्याचं काम अद्यापही सुरु असून रात्रभर युध्दपातळीवर केलेल्या कामानंतर मुंबई व पुणे दोन्ही बाजुकडे जाणारी मिडल लाईन व मुंबईकडे जाणारी अप लाईन सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
सकाळी साडेसात वाजता सिंहगड एक्सप्रेस व नांदेड एक्सप्रेस येथून मुंबईकडे रवाना झाली. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वेचे रुळ व स्लिपर खराब झाल्याने तसेच विजेचे खांब पडल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी डाऊन लाईन अद्याप पुर्णतः बंद आहे. डाऊन लाईन सुरु करण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.